• Wed. Mar 12th, 2025

महिला कुस्तीपटूंनी गाजवला जखणगावचा कुस्ती हंगामा

ByMirror

Apr 30, 2023

महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- जखणगाव (ता. नगर) यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती हंगामा महिला कुस्तीपटूंनी चांगलाच गाजवला. यामध्ये जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातील महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावून बक्षीसांची लयलूट केली. यावेळी गादीवर रंगलेल्या चितपट कुस्त्यांच्या थराराने ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.


गावोगावी यात्रा उत्सवानिमित्त कुस्ती हंगामा व मैदानात मल्लांच्या कुस्त्या रंगत असताना, जखणगावात बाबा गोदडशावली उरुसनिमित्त (यात्रा) महिला कुस्तीपटूंच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते.


या हंगामात कुस्तीपटू अलफिया शेख (जखणगाव) विरुध्द अक्षदा भंडारी (येरोडंली) यांच्यात मानाची कुस्ती लावण्यात आली. यामध्ये अलफिया शेख हिने आक्रमक खेळी करुन भंडारी हिला चितपट केले. याशिवाय अनेक महिला कुस्तीपटूंच्या कुस्त्या रंगल्या होत्या.

यावेळी जखणगावचे सरपंच डॉ. सुनिल गंधे, उपसरपंच शाबिया शेख, उद्योजक बाळासाहेब शहाणे, जिल्हा तालीम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, राष्ट्रीय कुस्ती पंच डॉ. रविंद्र कवडे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली देवकर-वल्लाकट्टी, पै.अकुंश गुंजाळ, सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू प्रतिभा डोंगरे, मनोज शिंदे, बाळू भापकर, पोलीस पाटील रमेश आंग्रे, ग्रामपंचायत सदस्या प्रगती कर्डीले, सुभाष सौदागर, डॉ. सुयश गंधे, शरद हाडोळे, निजाम शेख, नवनाथ वाळके, गणेश वाळके, प्रवीण कर्डिले, मनोहर काळे, अल्ताफ शेख, लक्ष्मी कर्डिले, विजय गंधे, बापू भीसे, संतोष जगताप, सॉलवीन सय्यद आदींसह ग्रामस्थ व महिला कुस्तीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. चितपट कुस्ती करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कुस्तीपटूंना दाद दिली व त्यांना रोख बक्षीस दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *