कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च शिक्षण, दारिद्रय व रोजगाराच्या प्रश्नावर शहरात मेळाव्याचे आयोजन
विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुनी महापालिका येथील मजूर अड्डयावर विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या वतीने संवाद बैठक पार पडली. या बैठकित असंघटित कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च शिक्षण, दारिद्रय व रोजगाराच्या प्रश्नावर कामगारांशी चर्चा करण्यात आली. तर सोमवारी (दि.20 मार्च) रोजी शहरातील टिळकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे होत असलेल्या जिल्हाव्यापी असंघटित कामगार मेळाव्यात सहभागी होण्याचे सर्व कामगारांना आवाहन करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक सचिन साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अध्यक्ष उत्तम भिंगारदिवे, प्रसिद्धी प्रमुख संतोष भवरे, बबन दिवे, दिपक गायकवाड, अशोक मोरे, मंगेश जावळे, सुनिल साळवे, सागर जाधव, महेंद्र ठोकळ, विनोद क्षेत्रे, दत्ता शिंदे आदी पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
सचिन साळवे म्हणाले की, सर्वसामान्य कामगार राजकीय सत्ता व कल्याणकारी योजनांपासून लांब आहे. कामगारांमध्ये एकजुट नसल्याने त्यांचा फक्त मतांसाठी वापर केला जात आहे. कामगारांचे लोकप्रतिनिधित्व करणारे नेते नसल्याने फक्त भांडवलदारांचा विचार केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य कामगारांवर अन्याय सुरु असून, असंघटित कामगारांना एकजुटीने संघर्ष करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तम भिंगारदिवे म्हणाले की, देशात महागाई वाढली असून, नाक्यावर काम करणार्या कामगारांना जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च व कुटुंबातील आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले असून, सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना मिळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संतोष भवरे म्हणाले की, कामगार हितासाठी सर्व असंघटित कामगारांना एकत्र येऊन न्याय, हक्कासाठी संघर्ष करावा लागणार आहे. शासन दरबारी मोजक्यांचा आवाज जाणार नसून, कामगारांच्या मोठ्या जनसमुदायाने केलेल्या बंडाची दखल सरकारला घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात होणार्या मेळाव्यात असंघटित कामगारांमध्ये त्यांच्या न्याय, हक्काची जागृती करण्यात येणार आहे. तसेच सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदवून संघटनेची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या मेळाव्यात ऊस तोड, बांधकाम कामगार, नाक्यावरील कामवार, शेतमजूर आदी असंघटित कामगारांना सहभागी करुन घेण्यासाठी जिल्हाभर संवाद बैठका सुरु आहेत.