बहुजन समाजाला मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून बोंडार हवेली (जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव खून प्रकरणाच्या निषेधार्थ शहरात मंगळवारी (दि.13 जून) सकल आंबेडकरी जनतेच्या वतीने काढण्यात येणार्या जन आक्रोश मोर्चाला बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाठिंबा देऊन सर्व बहुजन समाजाला या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग धरुन अक्षय भालेराव या युवकाचा खून करण्यात आला. त्याचे पडसाद राज्यभर उमटत असताना शहरात राज्य सरकारच्या विरोधात जन आक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकार्यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी काळुराम चौधरी, महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य सुनील लोहार, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी राजू खरात, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, विकास चव्हाण, शहराध्यक्ष मेजर राजू शिंदे, राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे, शहर महासचिव रवी चौधरी, कोषाध्यक्ष रामचंद्र पवार, नगर विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव, पारनेर प्रभारी जाधव, श्रीरामपूर विधानसभा प्रभारी सुनील मगर, कोपरगाव विधानसभा प्रभारी माधव त्रिभुवन, अकोले विधानसभा प्रभारी प्रकाश अहिरे, शंकर शेंडगे, विशाल पवार, सलीमभाई अख्तर आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व पदाधिकार्यांनी पक्षीय झेंडे बाजूला ठेऊन आंबेडकरी अनुयायी म्हणून या मोर्चात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तर बौद्ध युवक अक्षय भालेरावच्या हत्येचा निषेध बसपाच्या वतीने नोंदविण्यात आला.
