परीक्षा केंद्रावर पेन व गुलाबपुष्पाचे वाटप
विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेस आज गुरुवारपासून (दि.2 मार्च) सुरुवात झाली. भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अ.ए.सो.च्या भिंगार हायस्कूल मधील परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन व गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढून त्यांना मनमोकळ्या वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अभिजीत सपकाळ, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दिलीप ठोकळ, शिवम भंडारी, मनोहर दरवडे, दिपक धाडगे, लहू कराळे, अशोक पराते, गणेश शिंदे, प्रांजली सपकाळ, अंजली बोधक, भारत पवार, केशव रासकर, प्राचार्य राजेंद्र बेद्रे, उपप्राचार्य रावसाहेब कासार, पर्यवेक्षक भरत भालसिंग, रात्रप्रशालेच्या मुख्याध्यापिका विजया वाळुंजकर आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा उपक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील दहावी बोर्ड पहिली पायरी असून, या परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असते. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व तणावमुक्त पध्तीने पेपर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, सर्व परीक्षा सारखे असतात, मात्र दहावी बोर्डाची परीक्षा महत्त्वाची असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात मोठे दडपण असते. त्यांच्या मनातील दडपण दूर करण्यासाठी व त्यांना तणावमुक्तीने हसत खेळत परीक्षेला सामोरे जाण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल प्राचार्य राजेंद्र बेद्रे यांनी आयोजकांचे आभार मानले.