• Mon. Dec 1st, 2025

भरलेल्या शाळा गुरुजींनी सोडल्या

ByMirror

Mar 17, 2023

जुनी पेन्शनसाठी शाळा बंद ठेऊन संपात उतरण्याचे आवाहन

प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांचे शाळांना भेटी

अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी (दि.17 मार्च) प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी शहरासह नगर तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन शिक्षकांनी भरविलेल्या शाळा सोडून देण्यात आल्या. तर सर्व शिक्षक, शिक्षकेतरांना संपात सहभाग होवून शाळा बंद ठेवण्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, अमोद नलगे, खाजगी प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरमुडे, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सखाराम गारुडकर, नंदकुमार शितोळे, भाऊसाहेब जीवडे, शिक्षक भारतीचे बाबासाहेब लोंढे, गोवर्धन पांडुळे, दिलीप बोठे, संतोष ठाणगे, राहुल झावरे, नितीन गायकवाड, बाळासाहेब कुलकर्णी, प्रसाद सामलेटी, नंदकुमार हंबर्डे यांनी शुक्रवारी सकाळी शहर व नगर तालुक्यातील विविध शाळांना भेटी दिल्या. शहरातील राष्ट्रीय पाठशाळा, शिशु संगोपन गुगळे हायस्कूल तसेच पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालय व शिंगवे नाईक येथील न्यू इंग्लिश स्कूल भरविण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आंदोलक शिक्षकांनी सर्व भरलेल्या शाळा सोडून दिल्या.


काही ठिकाणी वसतीगृहातील शाळा देखील भरविल्या जात असल्याचे निदर्शनास आले. शालेय प्रशासनाला वर्ग न भरविता मुलांना वसतीगृहातच थांबवण्याची यावेळी विनंती करण्यात आली. शाळेत आलेल्या मुलांना घरी परत पाठवण्यासाठी आंदोलक शिक्षकांनी पालकांना फोन करून मुलांना घेऊन जाण्यासाठीही बोलावून घेतले.


समन्वय समितीच्या माध्यमातून संप यशस्वी केला जात आहे. जुनी पेन्शनसाठी सर्व शिक्षक, कर्मचारी पोटतिडकीने आंदोलनात उतरले आहे. जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय आंदोलनातून माघार नसून, सर्व शिक्षक, शिक्षकेतरांना आंदोलनात सहभागी होण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *