वाचनातून सक्षम पिढी घडविण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम
एका गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी आर्थिक मदत
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने स्नेहालय संचलित बालभवनच्या गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देऊन वाचनातून सक्षम पिढी घडविण्याच्या उद्देशाने महापुरुषांच्या आत्मचरित्रांची पुस्तके भेट देण्यात आली. भिंगार येथील ऊर्जा बालभवन मध्ये झालेल्या या कार्यक्रमात आठरे पाटील स्कूल मधील एका गरजू विद्यार्थ्यालाही शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकरराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, एकनाथ जगताप, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, अशोक पराते, संतोष हजारे, अभिजीत सपकाळ, सचिन धोंडे, दिलीपराव ठोकळ, धर्मराज संचेती, सिताराम परदेशी, सरदारसिंग परदेशी, बालभवनच्या उषा खोलम, राजू पांढरे, विक्रम भगत, निलोफर शेख, गुलनाज सय्यद, सुप्रिया सदलापूरकर, अंजूम शेख, शुभांगी विधावे, मीनाताई परदेशी, प्रफुल्ल मुळे, अविनाश काळे, श्रीरंग देवकुळे, कुमार धतुरे, प्रकाश देवळालीकर, राजू शेख, सुंदरराव पाटील, विठ्ठलराव राहिंज आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. आश्रम, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन, गरजूंचे शैक्षणिक शुल्क देखील भरण्यात येत आहे. तर बालभवन मध्ये वंचित घटकातील मुलांसाठी मागील दोन वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवून त्यांना आधार दिला जात आहे. मुलांमध्ये संस्कार व आत्मविश्वास रुजवण्यासाठी त्यांच्या हातात महापुरुषांच्या आत्मचरित्रांची पुस्तके वाचनासाठी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकरराव मुंडे म्हणाले की, संघर्षातूनच मनुष्य घडत असतो. आपण कुठे आहोत? यापेक्षा भविष्यात कुठे जायचे आहे? या विचाराने व ध्येयाने प्रेरित होण्याची गरज आहे. निसर्गाने सर्वांना समान संधी दिली असून, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे. बिकट परिस्थितीचा विचार न करता, शिक्षणाने बदल घडवता येतो हा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगावा. पाणी प्रमाणे प्रवाहित राहून, ध्येय गाठण्यासाठी अडचणींवर मात करण्याचे त्यांनी आवाहन केले.
उषा खोलन यांनी बालभवन च्या कार्याची माहिती करून दिली. बालभवनच्या माध्यमातून झोपडपट्टी भागातील मुलांमध्ये शिक्षण, आरोग्य व संस्कार रुजवण्याचे कार्य केले जात आहे. यामुळे मुलांचे अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शिक्षणाबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ जगताप यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा प्रत्येक सदस्य सामाजिक भावनेने योगदान देत आहे. संघर्षातून शिकणार्या मुलांना पाठबळ देऊन त्यांना उभे करण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बालभवन मधील मुलांना वह्या, पुस्तले व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलनाज सय्यद यांनी केले. आभार निलोफर शेख यांनी मानले.