• Sat. Mar 15th, 2025

बार्टीचे सामाजिक न्याय समता पर्व विविध उपक्रमांनी साजरा

ByMirror

Apr 17, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती सामाजिक न्याय समता पर्व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत राहुरी कृषी विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात समतादूतांनी जातीचे दाखले व जातपडताळणी संदर्भात मार्गदर्शन केले.


सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, बार्टी संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, बार्टी प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.


प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जातपडताळणी समितीचे भा.ऊ. खरे व समतादूत एजाज पिरजादे यांनी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व जातपडताळणीवर मार्गदर्शन केले. न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज पारनेर येथे समतादूत सुलतान सय्यद यांनी निरंतर वाचन कार्यक्रम घेऊन उपस्थित विद्यार्थी ना सामाजिक न्याय विभाग च्या विविध योजनांची माहिती दिली.


नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन समतादूत प्रेरणा विधाते यांनी केले होते. या शिबिरात गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, जेष्ठ नागरिक महिला, युवक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अकोले तालुक्यातील महात्मा फुले विद्यालयात समतादूत संतोष शिंदे यांनी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा बार्टीच्या वतीने सन्मान करण्यात आला.


अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात समता दूत यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम, व्याख्यान, समता रॅली, प्रबोधन कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा, आरोग्य शिबीर, जातपडताळणी बाबत माहिती, अनुसूचित जातीच्या वस्तीना भेट देऊन योजनांची माहिती देण्यात आली. तर निरंतर वाचन उपक्रम, नव उद्योजक कार्यशाळा अशा कार्यक्रमाने सामाजिक न्याय समता पर्व समतादूत व स्वयं सहायता युवा गट सदस्यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *