मोहरमच्या प्रारंभीच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून डागडुजी करण्याची मागणी
परिसरात स्वच्छतेचा बोजवारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बारा इमाम कोठला या ऐतिहासिक वास्तूच्या काही भागाची पडझड होण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना मोहरम उत्सवाच्या प्रारंभीच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने तातडीने लक्ष देवून त्याची डागडुजी करण्याची मागणी येथील मुजावर सय्यद रफा वहीद अली यांनी केली आहे. तर या ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना परिसराची स्वच्छता व खड्डेमय रस्त्याची पॅचिंग करण्याची मागणी देखील बारा इमाम ट्रस्टचे चेअरमन सय्यद दस्तगीर बडेसहाब यांनी केली आहे.

बारा इमाम कोठला ही ऐतिहासिक वास्तू बुर्हाण निजामशहा यांच्या काळात बांधली गेली आहे. या बांधकामाला सुमारे पावणे पाचशे वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. हे ऐतिहासिक स्मारकाच्या देखरेखची जबाबदारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे आहे. या वास्तूत दरवर्षी मोहरमध्ये इमामे हुसेन (छोटे बारे इमाम) यांच्या सवारीची स्थापना केली जाते.
शहरातील मोहरम राज्यभर प्रसिध्द असून, मोहरम पाहण्यासाठी व सवारीच्या दर्शनाला बारा इमाम कोठला येथे भाविकांची मोठी गर्दी असते. गुरुवार (दि.20 जुलै) पासून मोहरम उत्सवाला प्रारंभ होत आहे. मोहरम निमित्त सवारीच्या दर्शनासठी बारा इमाम कोठला येथे भाविकांची मोठी गर्दी राहणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून, बारा इमाम कोठला येथील बारा इमाम वाडा या ऐतिहासिक वास्तूच्या पडझड होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दगडी भिंतीला भेगा जाऊन काही भाग ढासाळण्याच्या परिस्थितीत आहे. तर भिंतीवर गवत, झाडे-झुडपे देखील वाढले आहे. या वास्तूचा पडण्यास आलेला भाग काढून घेऊन त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी मुजावर सय्यद रफा वहीद अली यांनी केली आहे. जोरदार पावसाने काही भाग भाविकांच्या अंगावर कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच येथील शाही कमानची देखील पडझड झाली असून, त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. पुरातत्व सर्वेक्षण विभागाने महिनाभरापूर्वी सदर वास्तूची पाहणी केली होती. मात्र डागडुजी करण्याची मागणी करुन देखील त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तर मोहरमच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने पहाणी करुन बारा इमाम कोठला परिसराची दरवर्षी स्वच्छता केली जाते. मात्र यावर्षी मोहरम काही दिवसावर येऊन ठेपली असताना कुठल्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली नाही. या परिसरात चिखल, पाण्याचे डबके व कचरा साचला आहे. येथे असलेल्या विहिरीत मोठ्या प्रमाणात निर्माल्य साचले असून, त्यावर असलेली संरक्षक जाळी देखील तुटली आहे. या मोठ्या परिसरासाठी मनपाने फक्त एक कंत्राटी कर्मचारी नेमला असून, त्याला इतर कामे देण्यात येत असल्याने त्याचा परिणाम येथील देखरेखवर होत आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात येथील स्वच्छता होत नाही. मोहरमनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची वर्दळ राहणार असल्याने या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी बारा इमाम ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.