जिल्हाधिकारी कार्यालया समोर बजेटमध्ये झालेल्या कटोतीचा निषेध
बजेट कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, युवा बेरोजगार व बहुजन समाजविरोधी असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या बजेटमध्ये केंद्र सरकारने केलेल्या कटोतीच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर शुक्रवारी (दि.10 मार्च) केंद्रीय बजेटची होळी करण्यात आली. केंद्राने सादर केलेला बजेट कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, युवा बेरोजगार व बहुजन समाजविरोधी असल्याचा आरोप करुन बजेट जलाव आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, उत्तर जिल्हाध्यक्ष गणपत मोरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद शिरसाठ, भाऊसाहेब जगदाळे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब पातारे, संजय कांबळे, अण्णा गायकवाड, शिवराम पाटोळे, वासुदेव राक्षे, अशोक साळवे, ऋतिक जाधव, संकेत गायकवाड, गौरव भोसले आदी सहभागी झाले होते.

केंद्रात वेगवेगळे सरकार सत्तेवर आले, परंतु आजपर्यंत कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला, युवा बेरोजगार व समस्त बहुजन समाजाच्या कल्याणासाठी कुठल्याही सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतुद केली नाही. उलट सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय बजेटच्या तुलनेत सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये कटोती करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, ग्रामीण विकास, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, मनरेगा योजना, प्रधानमंत्री सन्मान निधी, एग्रीकल्चर फर्टीलायझर, अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय या सर्व क्षेत्रातील निधी कमी करुन बहुजन समाजविरोधी अर्थसंकल्प सादर केला असून, यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पदरात काहीच पडणार नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

संविधानिक अधिकारापासून बहुजन समाजाला वंचित ठेवण्याचे काम केंद्र सरकारने केले असून, याविरोधात बहुजन मुक्ती पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी बजेट जलाव आंदोलन केले. त्याचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर बजेटची होळी करण्यात आली. केंद्राच्या बजेट विरोधी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
