महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीचा सामाजिक उपक्रम
महापुरुषांचे खरे विचार समाजापर्यंत जाण्याची गरज -संतोष जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी बसपाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटोळे, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, शहर महासचिव नंदू भिंगारदिवे, कोषाध्यक्ष दिपक पवार, व्यापारी रविंद्र पुरी, रामभाऊ परदेशी, पै. किरण लटपटे, सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटोळे, संस्थेचे चेअरमन मधुकर भावले आदींसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष जाधव म्हणाले की, महापुरुषांची जयंती डिजेवर नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांचे विचार अंगीकारण्यासाठी आहे. या दोन्ही महापुरुषांची जयंतीला सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. युवकांना महापुरुषांच्या विचाराने दिशा मिळणार असून, त्यांचे खरे विचार समाजापर्यंत जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संजय डहाणे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील घटक असलेले दिव्यांग विद्यार्थ्यांकडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे. वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज असून, या भावनेने उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
