महाराष्ट्र बँकेच्या देशभरातील एआयबीईएचे प्रतिनिधींची राहणार उपस्थिती
खाजगीकरणाला विरोध, पुरेशी नोकर भरती, थकीत कर्ज वसुलीवर होणार चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन आणि ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन संलग्न संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन शुक्रवारी (दि.7 एप्रिल) व शनिवारी (दि.8 एप्रिल) होणार आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारवंत उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार आणि महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी कॉ. देवीदास तुळजापूरकर, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर असोसिएशनचे कॉ. कृष्णा बरूरकर उपस्थित राहणार आहेत.
पहिल्यांदाच हे अधिवेशन शहरात होत आहे. शुक्रवारी (दि.7 एप्रिल) रोजी सायंकाळी 4:30 वाजता लक्षमीनारायण मंगल कार्यालय येथे अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. शनिवारी (दि.8 एप्रिल) सकाळी 10 वाजता प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. स्वयंप्रकाश तिवारी, सचिव कॉ. धनंजय कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या जॉइंट सेक्रेटरी कॉ. ललीता जोशी मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेशनात महाराष्ट्र बँकेतील अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील तीनशेपेक्षा जास्त प्रतिनिधी व महाराष्ट्र बँकेतील देशभरातून काम करणारे एआयबीईएचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात बँक खाजगीकरणाला विरोध, पुरेशी नोकर भरती साठीचा आग्रह, थकीत कर्जाच्या वसुलीसाठी परिणामकारक उपाय योजना आदी प्रश्नांवर चर्चा करुन यासाठीच्या सूचनांचे विशेष ठराव संमत करण्यात येणार आहेत. या अधिवेशनात जास्तीत जास्त बँक कर्मचारींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. शैलेश टिळेकर व कॉ. प्रकाश कोटा यांनी केले आहे.