युनियनच्या सदस्यांना सहभागी होण्याचे आवाहन
बँक कर्मचार्यांच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन
अहमदनगर (प्रतिनिधी)- बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन (पुणे) यांचे बारावे त्रैवार्षिक अधिवेशन शुक्रवारी (दि.7 एप्रिल) रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन कॉ. उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपट पवार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनच्या सदस्यांना सहभागी होण्याचे आवाहन सचिव कॉ. शैलेश टिळेकर यांनी केले आहे.
या दोन दिवसीय अधिवेशनात बँक कर्मचार्यांच्या प्रश्नांवर व पुढील ध्येय धोरणावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनाला ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज फोरमचे जॉईंट सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर मार्गदर्शन करणार आहेत.
तर यावेळी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या जॉईंट सेक्रेटरी कॉ. ललिता जोशी, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी कृष्ण बरुरकर उपस्थित राहणार आहे. शनिवारी (दि.8 एप्रिल) सकाळी प्रतिनिधींची सभा होऊन या अधिवेशनाचा समारोप होणार आहे.