• Wed. Jan 21st, 2026

प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा, कागदी पिशव्यांचा स्विकार करण्याची चिमुकल्यांची हाक

ByMirror

Jul 12, 2023

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये जागतिक पेपर दिन उत्साहात साजरा

दुकानदारांना वाटण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनविल्या हजारो कागदी पिशव्या

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बाजारात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा, कागदी पिशव्यांचा स्विकार करुन पर्यावरणावरील होणारा दुष्परिणाम थांबविण्याची हाक अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिली. बुधवारी (दि.12 जुलै) शाळेत जागतिक पेपर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी कागदापासून रंगीबिरंगी पिशव्या बनवून आणल्या होत्या.


प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे जनावरे, प्राण्यांच्या आरोग्याचा विचार करा, पर्यावरणाला होणारे नुकसान टाळण्याचा संदेश देत, विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबविण्याचा संकल्प केला. मंजुश्री बिहाणी, प्रभा खंडेलवाल, शितल मंत्री व कविता मंत्री यांनी या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि नैसर्गिक वातावरणास निर्माण होणार्‍या गंभीर धोक्याबद्दल माहिती देऊन, दैनंदिन वापरात कागदी पिशव्यांचे महत्व समजावून सांगितले. आणि पालकांकडे व बाजारात गेल्यावर पेपर बॅगचाच आग्रह धरण्याचे आवाहन केले.


विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर भाबड म्हणाले की, प्लास्टिक पिशव्यांचे पूर्णपणे विघटन होण्यास शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. आपल्या वातावरणाचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिकऐवजी कागदी पिशवी वापरुन भविष्यातील संकट टाळता येणार आहे. प्लास्टिक पिशव्यांचे वापर कमी न झाल्यास त्याचे मानवी व प्राणी जीवनावर गंभीर दुष्परिणाम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व विद्यार्थ्यांनी पेपर बॅग बनवून सजवून आनले होते. यावेळी उपप्राचार्या कविता सुरतवाला, सर्व विभाग प्रमुख व शालेय शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमातून जमा झालेले सर्व कागदी पिशव्या विविध दुकानदार, मॉल, ग्राहकांना देऊन प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्याचे आवाहन केले जाणार आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *