• Wed. Nov 5th, 2025

पोदार इंटरनॅशनल स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Feb 3, 2023

सांस्कृतिक कार्यक्रमातून अमूल्य भारतचे दर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. शाळेच्या प्रांगणात हा सोहळा थाटात पार पडला. अमूल्य भारत या संकल्पनेवर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी रंगला होता.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एअर फोर्सचे विंग कमांडर पी. एस. पठानिया व उद्योगपती सावन छाब्रा उपस्थित होते. तर पोदार स्कूल वाघोलीचे मुनिश शर्मा, पोदार स्कूल रोहकलचे संजीव भारद्वाज, पोदार स्कूल तळेगावचे सुदर्शन नायक, पोदार स्कूल औरंगाबादचे लुईस रॉड्रिग्ज, पोदार स्कूल चिंचवडच्या शहनाज कोत्तर, पोदार स्कूल चाकणच्या श्रीमती एस. कौर, पोदार स्कूल वाकडचे सी.आय. इ. श्रीमती नीता कुमार, पोदार स्कूल शिरूरच्या मीनल वैद्य, पोदार स्कूल सारा सिटीच्या अर्चना कारंडे, पोदार स्कूल दौंडचे विशाल जाधव, पोदार स्कूल संगमनेरचे निलेश पितळे, पोदार स्कूल चाळीसगावचे अजय घोरपडे, सातार्‍याचे पोदार स्कूलचे अ‍ॅडमीन मॅनेजर मनोज जाधव, खटावच्या सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूलचे महेंद्र काटकर, बारामती पोदार स्कूलचे लीगल अ‍ॅडव्हायझर राहुल बांदल आदींसह पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.


या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेख, कविता, निबंध यांचे तयार केलेल्या मासिकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचा वार्षिक अहवाल विद्यार्थी प्रतिनिधी अंजली जगताप व सार्थक दौंड यांनी सादर केला.


विंग कमांडर पठानिया म्हणाले की, पोदार इंटरनॅशनल स्कूल अहमदनगर मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच विविध कला व क्रीडा क्षेत्रात पोदर स्कूलचे विद्यार्थी चमकत आहे. यासाठी त्यांनी शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप राबवीत असलेल्या नवनवीन संकल्पनांचे कौतुक केले.


विविध विषयांमध्ये प्राविण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन आर्या शिंदे व प्रांजल सोनवणे या विद्यार्थ्यांनीनी केले. शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांनी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहून सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे प्राचार्य जगताप यांच्या संकल्पनेतून अमूल्य भारत या संकल्पनेने वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आखण्यात आला होता. इयत्ता पहिली ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांच्या लोककला, नृत्य तेथील संगीत, प्रथा व परंपरा याविषयीची माहिती देऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कश्मीरी नृत्य, पंजाबचा भांगडा, महाराष्ट्राचा जागरण-गोंधळ, तर गुजरातच्या दांडिया, राजस्थानचे घुमर, आसामचा आसामी नृत्य, वेस्ट बंगाल मधील दुर्गाष्टमीचे महत्व, त्याचबरोबर अनेक विनोदी चुटकुले सांगत विनोदी नाटक यावेळी सादर करण्यात आले.


पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दर्जेदार असा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेतल्याबद्दल शाळेचे प्राचार्य व शिक्षकांचे पालकांनी आभार मानले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत राबवित असलेल्या विविध उपक्रमातून होणारी प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. तर मुलांचे कलागुण पाहून पालकांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीनिशा पारख व परि लंके या विद्यार्थिनींनी केले. आभार विद्यार्थी प्रतिनिधी अंजली जगताप हिने मानले. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *