गावात आरोग्याचा जागर
महापुरुषांच्या कार्याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने समाजातील दुर्बल घटकांना आधार द्यावा -डॉ. संतोष गिर्हे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय व उमंग फाउंडेशनच्या वतीने पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्याचा जागर करुन बाबासाहेबांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच मोनिकाताई आढाव, उपसरपंच गोरक्षनाथ वाघ, ग्रामसेवक मृणालीनी रोकडे, उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिर्हे, ग्रामपंचायत सदस्य रेखाताई आल्हाट, संतोष आल्हाट, राहुल आल्हाट, जय युवा अकॅडमीचे अॅड. महेश शिंदे, पोपट बनकर, डॉ. युवराज लकडे, डॉ. नेने, डॉ. पागिरे, आप्पासाहेब शेळके, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मारुती पाटोळे, भगवान आढाव, अरुण आढाव, इस्माईल शेख, जगन्नाथ मगर, सोसायटीचे चेअरमन सुभाष आढाव,भाऊसाहेब मोरे, माणिक आल्हाट, सीताराम आल्हाट, पास्टर राजू आल्हाट, प्रा. संतोष रोकडे, मुख्याध्यापिका सौ. ससे, दादू गायकवाड, फाउंडेशनच्या सचिव वैशाली कुलकर्णी, महेंद्र गिर्हे, नंदू खरपूडे, मेघा भडांगे, रोहित आल्हाट, चांद शेख, सविता हराळ,शोएब शेख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात फाउंडेशनच्या सचिव वैशाली कुलकर्णी म्हणाल्या की, सामाजिक परिवर्तनाची नांदी डॉ.बाबासाहेबांच्या कार्याने घडली. बाबासाहेबांनी समाजाच्या उध्दारासाठी शिका संघटित व्हा व संघर्ष करण्याचा कानमंत्र दिला. समाजाच्या उध्दारासाठी व दीन-दुबळ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी सर्वस्वी पणाला लावले. अशा महापुरुषांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांच्या विचाराने उमंग फाउंडेशनचे समाजकार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. संतोष गिर्हे म्हणाले की, नावासाठी काम न करता, सामाजिक सेवेचा वसा घ्यावा लागतो. दोन, तीन सामाजिक उपक्रम घेवून समाजकार्य घडत नसून, त्यासाठी सातत्य हवे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारानेच उमंग फाउंडेशन योगदान देत आहे. महापुरुषांनी केलेल्या कार्याची जाणीव ठेऊन प्रत्येकाने समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच मोनिकाताई आढाव यांनी महापुरुषांचे विचार अंगीकारल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे सांगून, या उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिरात रुग्णांची आरोग्य तपासणी करुन त्यांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. या उपक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरंगे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक शिवाजीराव खरात यांचे मार्गदर्शन लाभले.