निमगाव वाघाच्या होईकात भाकित
मागील वर्षी सांगितलेले जनावरांची रोगराई लम्पी आजाराने समोर
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. मागील वर्षी कोरोना महामारीचे संकट साडेपाच महिन्यात संपणार असल्याचे भाकित व लक्ष्मीला पिडा असल्याचे म्हणजेच शेतकर्यांच्या जनावरांना रोगराई सांगितली होती. ती लम्पी स्कीन आजाराच्या रुपाने खरे ठरले. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक (भविष्यवाणी) सांगताना पुढील वर्षी येणार्या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तर चांगल्या पाऊस पाण्याने पिकं पाणी चांगले राहणार असल्याचे सांगताच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. भविष्यवाणी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
पशु हत्या बंदीचे पालन करुन देवाला भाजी-भाकरीचा नैवद्य दाखविण्यात आला. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी अंगावर वेताचे फटके ओढून भविष्यवाणी (होईक) सांगताना म्हणाले की, बाया न्हात्यान, धुत्यान व पालखीत मिरत्याल. लक्ष्मीला म्हणजेव पशु धनाला पिडा नसल्याचे त्यांनी सांगितले. बाळाला संकट असून, चित्ता सवातीचा पाच ते अडीच दिवस तिन खंडात आभाळ फिरेल.

दिवाळीच दिपान सात दिवस आभाळ येऊन काही ठिकाणी पाऊस पडेल. सटीच सटवान सात खंडात फिरुन कर्मभागी पाऊस होणार आहे. गायी देठाला लागून, नव तूप होणार. पिकांना रोगराई नसणार, सोने, कापूस, गहू, हरभराचे मनभाव राहणार असल्याचे सांगितले. तर कल्याण कुर्तिकाचा पाच खंडात आभाळ फिरुन तसेच जेठुडी साधली जाईल म्हणजेच पाऊस होईल. त्याने मुगराळ्याची पेर होईल, पुढील वर्षी आखाडी चांगली होईल ज्वारी, गहू, हरभराची पेर होईल, असे भाकीत होईकात सांगण्यात आले आहे.

गावातील भविष्यवाणी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, गोकुळ जाधव, बाबा जाधव, नामदेव जाधव, अंशाबापू शिंदे, बाबा पुंड, संजू डोंगरे, रामदास वाखारे, पांडूरंग गुंजाळ, राजू भुसारे, नवनाथ जाधव, सुरेश जाधव, ठकाराम शिंदे, बबन कापसे, भाळू भुसारे, अंबादास निकम, युवराज भुसारे, गुलाब जाधव, एकनाथ भुसारे यांनी परिश्रम घेतले. भाविकांसाठी गावात भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते.
