गो ग्रीनचा संदेश देत सनबिम्स मध्ये रंगली फॅन्सी ड्रेस स्पर्धा
महिला पालकांचा पाककला स्पर्धेत सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- गो ग्रीनचा संदेश देत सनबिम्स प्री प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची पर्यावरणावर आधारीत फॅन्सी ड्रेस स्पर्धा व पालकांसाठी पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थी व पालकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पान, फुले, फळ, झाड व पालेभाज्यांच्या वेशभूषेत अवतरलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

लहान मुलांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण होऊन त्याचे महत्त्व लक्षात येण्याच्या उद्दिष्टाने पाईपलाइन रोड, श्रीराम चौक येथील सनबिम्स स्कूलमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला होता. स्पर्धक विद्यार्थ्यांनी स्वत: धारण केलेल्या वेशभूषेची माहिती देऊन विविध पात्रातून आपल्या गुण कौशल्याची चुणुक दाखविली. विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. विद्यार्थ्यांसह महिला पालकांनी देखील पाककला स्पर्धेत सहभाग नोंदविला. पाककला स्पर्धेत महिला पालकांनी विविध हिरव्या पालेभाज्यांचे स्वादिष्ट खाद्य पदार्थ बनवले होते. पालकांसह विद्यार्थ्यांचा प्रश्नोउत्तरांचा कार्यक्रम रंगला होता.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून कुंदा हलबे, शरली ठोलार व नीलांगी गडाख उपस्थित होत्या. सनबिम्स व कर्नल परब स्कूलच्या सीईओ फाउंडर गीता परब यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका भावना शिंगवी यांनी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हसत-खेळत गुणवत्तापुर्ण शिक्षण या ध्येयाने स्कूलची वाटचाल सुरु असून, त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांच्या गो ग्रीन फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रिन्सेसचा गो ग्रीनचा किताब जिया जग्गड हिने पटकाविला. यामध्ये फर्स्ट रनर अप अभिज्ञा गरुड, सेकंड रनर अप विवान पानसरे, उत्तेजनार्थ आरवी, तसेच महिला पालकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत मिस गो ग्रीनचा किताब माधवी गरुड यांनी पटकाविला. यामध्ये फर्स्ट रनर अप जयश्री बेरड, सेकंड रनर अप वृंदा परभणे, उत्तेजनार्थ परमार यांनी बक्षिसे मिळवली. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांसह पालकांना गौरविण्यात आले.
कुंदा हलबे म्हणाल्या की, सनबिम्स प्री प्रायमरी स्कूलमध्ये मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार देखील रुजवले जात आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून, पर्यावरणवादी पिढी घडविण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कर्नल परब स्कूलचे संचालक रिकीराज परब यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जानवी धनवाणी, जानवी पारधे, रागिनी पटवारी, ममता बारसे या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
