पहाटेपासून योगसाधनेला सुरुवात; दीडशेहून अधिक साधकांचा सहभाग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्यनमस्कार दिन अत्यंत उत्साहात व निरोगी जीवनासाठी व्यायामाचा संदेश देऊन करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योगसाधकांनी सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केली. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आरोग्य निरोगी, सुदृढ व आनंदी राहावे यासाठी आनंद योग केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना नियमितपणे निशुल्क योग, प्राणायाम व ध्यानाचे धडे दिले जातात. सर्वसामान्य नागरिकांमध्ये योग व प्राणायामाबाबत जागृती निर्माण व्हावी, तसेच दैनंदिन जीवनात योगाचा समावेश व्हावा या उद्देशाने जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.
या विशेष उपक्रमात दीडशेपेक्षा अधिक योगसाधकांनी सहभाग नोंदविला. उपस्थित साधकांना सूर्यनमस्काराचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे समजावून सांगण्यात आले. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत सातत्याने सूर्यनमस्काराची साधना सुरू होती. प्रत्येक साधकाने आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्कार पूर्ण केले.
या संपूर्ण उपक्रमासाठी आनंद योग केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली योगसाधनेचे योग्य नियोजन करण्यात आले होते. कटारिया म्हणाले की, सूर्यनमस्कार ही केवळ शारीरिक व्यायामाची क्रिया नसून ती शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी एक संपूर्ण योगसाधना आहे. नियमित सूर्यनमस्कार केल्यास शरीरातील आजारप्रतिकारक शक्ती वाढते, पचनसंस्था सुधारते, मन प्रसन्न राहते आणि तणाव कमी होतो.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत माणूस स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. योग आणि प्राणायाम ही अशी साधने आहेत जी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सहज करू शकते. आनंद योग केंद्राच्या माध्यमातून आम्ही समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने अधिकाधिक नागरिकांनी योगाकडे वळावे, नियमित सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प घ्यावा आणि निरोगी, आनंदी जीवन जगावे, हीच आमची अपेक्षा आहे. योग ही जीवनशैली बनली तर अनेक आजारांपासून आपण स्वतःला दूर ठेवू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
