अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या दक्षिण नगर जिल्हा निमंत्रकपदी ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे यांची तर समन्वयकपदी पत्रकार बंडू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उत्तर नगर जिल्ह्याचे निमंत्रक म्हणून गुरूप्रसाद देशपांडे (नेवासा) यांची तर समन्वयक म्हणून राजेंद्र उंडे (राहुरी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची घोषणा राज्य निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी केली.

राज्यातील पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय समित्या बरखास्त करण्यात आल्या असून, आता नव्याने जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या गठीत करण्यात येत आहेत.त्यानुसार दक्षिण आणि उत्तर नगर जिल्ह्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दोन्ही जिल्ह्यात पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या सक्षम करण्याची जबाबदारी नवीन पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
नवीन नेमणुका पुढील दोन वर्षांसाठी असतील. हे पदाधिकारी मराठी पत्रकार परिषदेला पूरक असे काम करतील, असेही देशमुख यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी अभिनंदन केले आहे.