लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने
पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची शासनाकडे मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे वरिष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्या, राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ले व खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. पत्रकारांनी काळ्या फिती लावून जोरदार घोषणाबाजी केली.
लोकसेवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन दिले या आंदोलनात लोकसेवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आबिद शेख, बाळासाहेब नेटके, माणिकराव वाघ, सुनील ठाकरे, असीम शेख, इमरान शेख, नागेश शिंदे, रोहिणी पवार, हिना सय्यद आदी सहभागी झाले होते.
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणारया पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धाकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण झाली असल्याचे यावेळी उपस्थित पत्रकार म्हणाले.
राजापूर (जि. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणार्या गाडीने त्यांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, शशिकांत वारीसे गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. वारीसे यांनी ज्याच्या विरोधात बातमी प्रसिध्द केली, ते कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देतो, त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला खूनच असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या घटल्याची सुनावणी फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत व्हावी, हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
