विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण
युवकांनी सांस्कृतिक वारसा जोपासावा -राधाकिसन देवढे
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांनी सांस्कृतिक वारसा जोपासावा. आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करण्यासाठी कठोर परिश्रम, सराव, जिद्द व आत्मविश्वास ठेवल्यास निश्चित यश मिळते. स्पर्धामध्ये खेळाडू वृत्तीने सहभागी होऊन युवकांनी देश विकास साधण्याचे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले.
नेहरु युवा केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सव 2023 चे उद्घाटन जिल्हा रुग्णालय अंतर्गत शासकीय परिचर्या महाविद्यालय येथे झाले. यावेळी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त देवढे बोलत होते. नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक शिवाजीराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत पाठक, डॉ. निलेश गायकवाड, महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गजेॅ, शासकीय परिचर्या महाविद्यालयाचे प्राचार्य शरद खटके, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे, अॅड. सुनील तोडकर, जय युवाचे अध्यक्ष अॅड. महेश शिंदे, सीए शंकर अंदानी, पोपटराव बनकर, अनंत द्रविड, दिनेश शिंदे, गायत्री गुंड, आरती शिंदे, स्वाती डोमकावळे, श्रीकृष्ण मुरकुटे आदींसह विद्यार्थी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी रोपाला पाणी अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बचत गटातील उत्पादित वस्तू, पर्स, पिशव्या, उन्हाळी पदार्थ, मसाले आदीच्या स्टॉल प्रदर्शनाचे शुभारंभ करण्यात आला. तर क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या विविध पुस्तके, शासकीय योजनांबाबत माहिती स्टॉलवर देण्यात आली.

शिवाजीराव खरात यांनी युवकांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवा कार्यक्रम क्रीडा आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार देशभरात युवा उत्सव साजरा होत असल्याची माहिती दिली. अॅड. महेश शिंदे यांनी विकसित भारताचे ध्येय, राष्ट्रीय एकता, नागरिकांचे कर्तव्य, वारसांचे अभिमान, गुलामगिरीच्या खुणा पुसून टाका या थीमवर विविध स्पर्धा असून, युवा संवादचा हा उपक्रम आहे. यातून देशभक्ती वाढीस लागून युवाशक्तीच्या विकास होणार असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य शरद खटके, अॅड. सुनील तोडकर यांनी मार्गदर्शन केले.
चित्रकला स्पर्धेत प्रथम- ऋतुजा कासार, द्वितीय- अंकिता निमसे, तृतीय- आयेशा शेख, समूहनृत्य स्पर्धेत प्रथम- शासकीय परीचर्या महाविद्यालय एएनएम ग्रुप, द्वितीय- नर्सिंग कॉलेज जीएनएम ग्रुप, तृतीय- दिशा डान्स स्टुडिओ, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम- प्रताप भवर, द्वितीय- महेश उशीर, तृतीय- रूपाली गिरवले, कविता लेखन स्पर्धेत प्रथम- आरती शेवंते, द्वितीय- मंगल घोगरे, तृतीय- अमोल तांबडे यांनी क्रमांक पटकाविले. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसाची रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. यातील प्रथम क्रमांकाचे सर्व विजेत्यांना राज्य पातळीवर संधी मिळणार आहे.

विविध स्पर्धेचे परीक्षण अनंत द्रविड, पोपट बनकर, जयश्री शिंदे, अॅड. सुनील तोडकर, श्रीकृष्ण मुरकुटे, गायत्री गुंड, विजय भालसिंग, आरती शिंदे, छाया शिंदे, भारती शिंदे, डॉ. संतोष गिर्हे, दिनेश शिंदे, रमेश गाडगे, सिद्धार्थ चव्हाण आदींनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवाकर्मी, जयेश शिंदे, अॅपस्टॅपी डान्स अकॅडमी, रसिक रंजन ग्रुप, जय युवा अकॅडमी, उडान फाउंडेशन, रयत प्रतिष्ठान, समृद्धी संस्था आदींनी परिश्रम घेतले.