फटाक्यांच्या आतषबाजीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाच्या (बाळासाहेबांची) शिवसेनेला मिळाल्याचा बोल्हेगाव फाटा येथे बोल्हेगाव, नागापूर व एमआयडीसी परिसरातील शिवसैनिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
शिवसेनेचे (बाळासाहेबांची) जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे, जिल्हाध्यक्ष आकाश कातोरे व नगरसेवक मदन आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या जल्लोषाप्रसंगी हर्षवर्धन देशपांडे, राजू ढगे, अक्षय ठाणगे, नवनाथ कातोरे, पप्पू कातोरे, अतुल पाखरे, दत्ता ढोकणे, सागर कांडेकर, योगेश कातोरे आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आकाश कातोरे म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेचा हा विजय आहे. या निर्णयाने सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
योगेश गलांडे म्हणाले की, या निर्णयाने अखेर सत्याचा व स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे. शिवसेनेत पुन्हा पूर्वीचा चैतन्य, उत्साह व ऊर्जा संचारली गेली आहे. तोच विचार व तोच चिन्ह व नावाने समाजात शिवसेना तळागाळापर्यंत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मदन आढाव यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाने खर्या शिवसैनिकांचा गगनात मावेनासा झाला असून, पुन्हा तोच शिवसेनेचा झंझावात महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या रुपाने अनुभवयाला मिळणार असल्याचे सांगितले.
