निमगाव वाघा ग्रामपंचायत व एकता फाऊंडेशनचा उपक्रम
प्रत्येकाचा स्वाभिमान जागरुक करुन महाराजांनी स्वराज्य घडविले -अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत समोर भगव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारण्यात आली. तर यावेळी एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने इयत्ता दहावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामसेवक गोवर्धन राठोड व फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, संजय फलके, संजय कापसे, ज्ञानदेव कापसे, लता फलके, उज्वला कापसे, बारकू जाधव, साहेबराव बोडखे, संजय पुंड, रामदास पवार, दीपक गायकवाड, प्रमोद जाधव, पिंटू जाधव, मयूर काळे, विजय भगत, नवनाथ फलके, सोमनाथ आतकर, दत्तात्रय जाधव, विठ्ठल जाधव, दिलीप जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

अतुल फलके म्हणाले की, शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नसून, त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. प्रत्येकाचा स्वाभिमान जागरुक करुन स्वराज्य घडविले. जाती, धर्मापलीकडे जाऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. आजच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करण्याची गरज असल्याचे सांगितले.
ग्रामसेवक गोवर्धन राठोड यांनी देशाचा विकास शिक्षणावर अवलंबून आहे. युवकांनी उच्च शिक्षित होऊन देशाच्या विकासाला चालना द्यावी. उच्च शिक्षण घेऊन विदेशात नोकरी करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने स्वराज्यात योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी गावातील नवनाथ विद्यालयात प्रथम आलेली ज्ञानेश्वरी विजय भगत (80.60 टक्के), द्वितीय- निकीता विठ्ठल जाधव (77.60 टक्के), तृतीय- युवराज दत्तात्रय जाधव (72.40 टक्के) या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.