लक्ष्मीआई यात्रेनिमित्त गावात सामाजिक उपक्रम
महागाईच्या काळात मोफत आरोग्य शिबिर सर्वसामान्यांना आधार -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे लक्ष्मीआईची यात्रेनिमित्त स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, श्री नवनाथ युवा मंडळ व वैष्णवी ऑप्टीकल्सच्या वतीने मोफत नेत्र शिबिर घेण्यात आले. या शिबिरास पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, पै. अनिल डोंगरे, जालिंदर शिंदे, डॉ. वैष्णवी जरबंडी, नेत्रतज्ञ डॉ. ओंमकेश कोंडा, बाबुराव जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, पिंटू पवार, अशोक निमसे, प्रतिभा डोंगरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना खर्चिक आरोग्य सुविधांचा खर्च पेळवत नाही. मोफत आरोग्य शिबिर सर्वसामान्यांना आधार ठरत आहे. सण-उत्सव सामाजिक उपक्रमातून साजरे झाल्यास उत्सवाचा खरा आनंद मिळून सर्वसामान्यांना याचा लाभ मिळणार आहे. या शिबिरातून अनेक दृष्टी दोष असलेल्या ग्रामस्थांना नवदृष्टी मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील सावता महाराज मंदिरात झालेल्या या शिबिरात नेत्रतज्ञ डॉ. ओंमकेश कोंडा व डॉ. वैष्णवी जरबंडी यांनी नेत्र तपासणी करुन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शिबिरातील गरजू लाभार्थींवर पुढील उपचार अल्पदरात होणार आहेत. या शिबिरात तब्बल दीडशेपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली.