स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्याचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगर, नेहरु युवा केंद्र, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या वतीने गावातून मातीला नमन, वीरांना वंदन! करुन हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. मातीने भरलेले कलश डोक्यावर घेऊन मुली या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. भारत माता की जय…, वंदे मातरम… च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
या रॅलीत डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, तृप्ती वाघमारे, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, प्रमोद थिटे, प्रशांत जाधव, लहानबा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक निलेश थोरात, निळकंठ वाघमारे आदींसह शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी तिरंगे ध्वज घेऊन जोरदार घोषणा दिल्या. तिरंगा रॅलीने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले. गावातील शहीद स्मारक येथे वीर जवानांना नमन करण्यात आले. या कार्यक्रमात देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांचे ऋण न फेडता येणारे आहे. त्यांच्या स्मरणाने देश कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. या वीरांच्या स्मृतीला नमन करुन सक्षम भारत उभा राहत असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी फणीकुमार व नेहरु युवा केंद्राचे राज्य उपनिदेशक शिवाजी खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
