छाननीत अर्ज वैध
बनकर यांना सैनिक समाज पार्टी कडून पुरस्कृत करणार -अॅड. शिवाजी डमाळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी नगर मधील रयत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पोपट बनकर यांनी भरलेला अर्ज छाननीत वैध ठरला आहे. प्रस्थापित घराणेशाही मोडीत काढण्याचा व सुशिक्षित बेरोजगार, वकील, शिक्षक, शासकीय कर्मचारी, अभियंता यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे बनकर यांनी सांगितले आहे.
पोपट बनकर हे गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहे.स्वच्छ प्रतिमेमुळे राजकीय क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत.
गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी त्यांनी केली आहे. सामाजिक संस्था, पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा सामाजिक प्रश्नांविषयी सरकारचे लक्ष वेधले आहे. उमेदवारी अर्ज भरताना अॅड. शिवाजी डमाळे, अॅड. महेश शिंदे, रावसाहेब काळे, राजेंद्र शिंदे, अॅड. बायजा उर्फ स्वाती गायकवाड, पल्लवी डमाळे, दीपक वर्मा, भाऊसाहेब कासार आदी उपस्थित होते.
सैनिक समाज पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवाजीराव डमाळे यांनी बनकर यांच्या उमेदवारीला पक्षा कडून पुरस्कृत करणार असल्याचे जाहीर केले. अॅड. डमाळे म्हणाले की, प्रस्थापित घराणेशाही मोडीत काढून सर्वसामान्य शेतकरी पुत्र या निवडणुकीत उतरला आहे. सर्वसामान्य, मध्यमवर्ग यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बनकर यांच्या माध्यमातून एक चांगला पर्याय समोर आला आहे. महाराष्ट्रभर सैनिक समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचे जाळे बनकर यांच्या उमेदवारीसाठी लाभदायक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बनकर यांच्या उमेदवारीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.