जीवनधारा प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश
नगरसेवक कुमारसिंह वाकळे नागरिकांच्या मदतीला आले धावून
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर, बोल्हेगाव उपनगरातील नागरिक खड्डेमय रस्त्यांनी वैतागले असताना, महापालिका प्रशासनाने दखल घेऊन खड्डेमय रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे काम सुरु केले आहे. जीवनधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन नागापूर, बोल्हेगाव येथील खड्डेमय रस्त्याप्रश्नी लक्ष वेधून आंदोलनाचा इशारा दिला होता. नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी सदर प्रश्नी महापालिकेला पाठपुरावा करुन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम मार्गी लावले आहे.
नागापूर, बोल्हेगाव येथे ऐन दिवाळीच्या सणासुदीला घरांसमोर साचलेले डबके, खड्डेमय रस्त्यांमुळे होणारे अपघात व रस्त्यालगतच्या उघड्या गटारी व ड्रेनेजमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. रस्त्यालगतच्या उघड्या गटारी व नादुरुस्त चेंबर यात पावसामुळे पाणी साचलेले असून, नागरिकांना दुर्गंधी आणि साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

जीवनधारा प्रतिष्ठानने या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिला होता. या प्रश्नाची नगरसेवक वाकळे यांनी तातडीने दखल घेऊन महापालिका प्रशासनाला पाठपुरावा करुन पहिल्या टप्प्यात खड्डेमय रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे काम हाती घेतले आहे. तर इतर प्रश्न देखील सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेतल्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहे.
नागापूर, बोल्हेगाव येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. तर उघड्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नांची दखल घेऊन नगरसेवक कुमारसिंह वाकळे धावून आले. मात्र इतर नगरसेवकांनी देखील जबाबदारी स्विकारुन नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. -अमोल लगड (अध्यक्ष, जीवनधारा प्रतिष्ठान अध्यक्ष)