वृत्तपत्र छायाचित्रकार अग्रवाल याच्या मुलाच्या उच्च शिक्षणाची घेतली जबाबदारी
मराठी पत्रकार परिषदेचा पाठपुरावा
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वृत्तपत्र छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाचे उच्च शिक्षणासाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या माध्यमातून फाऊंडेशनचे विश्वस्त तथा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी शैक्षणिक पालकत्व स्विकारले. तर भविष्यात त्याला नोकरीची संधी देखील उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने फिरोदिया यांच्याकडे सदर प्रश्नाबाबत पाठपुरावा करण्यात आला होता.
काही दिवसांपुर्वी वृत्तपत्र छायाचित्रकार अग्रवाल यांचे ह्रद्य विकाराचा झटका व त्यानंतर ब्रेन स्ट्रोकने निधन झाले. त्यांचा मुलगा देव अग्रवाल हा हुशार असून, तो अहमदनगर महाविद्यालयात बीसीए चे शिक्षण घेत आहे. त्याने अंतिम वर्षाची परीक्षा दिली असून, त्याचा निकाल येणे बाकी आहे. मात्र यापुढे त्याला दोन वर्षाचा एमसीए चे शिक्षण पूर्ण करायचे आहे. पितृछत्र हरपल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळल्याने देव याच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता.
ही बाब लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांनी उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्याकडे पाठपुरावा केला. फिरोदिया यांनी पहिल्या भेटीतच देव अग्रवाल याच्या उच्च शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्विकारणार असल्याचे सांगितले. यावेळी अहमदनगर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे दत्ता इंगळे, राजू शेख, सचिन अग्रवाल आदी उपस्थित होते.
नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, जितेंद्र अग्रवाल हा सामाजिक भावनेने वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून शहरात कार्यरत होता. त्याच्या अनेक जुन्या आठवणी असून, त्याची निधनाची वार्ता कळल्याने पहिल्यांदा विश्वास बसला नाही. आपल्या मुलाला त्याने मोठ्या कष्टाने शिकवले, त्याचे पुढचे शिक्षणाची जबाबदारी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या माध्यमातून स्विकारली जाणार आहे. त्याने उच्च शिक्षण पूर्ण करुन आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जावे. फिरोदिया परिवाराच्या वतीने त्याला सर्व परीने मदत केली जाणार आहे. त्याने देखील शिकून आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज करण्याचे सांगितले. तर नोकरीसाठी देखील सहकार्य करून त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मन्सूर शेख यांनी नरेंद्र फिरोदिया यांनी नेहमीच गरजू खेळाडू व विद्यार्थ्यांना पाठबळ दिले आहे. पत्रकारांच्या सुख, दु:खात देखील ते नेहमीच सहभागी असतात. अग्रवला यांच्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी त्यांनी पुढे केलेला मदतीचा हात प्रेरणादायी आहे. सेवा, त्याग व समर्पण या भावनेने त्यांचे सामाजिक कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
