• Tue. Jul 1st, 2025

नजराणा हास्याचा कार्यक्रमात नगरकर लोटपोट

ByMirror

Sep 21, 2022

स्मिता ओक व दिलीप हल्याळ यांचा विनोदी कार्यक्रमाचा नजराणा

श्रीदीप हॉस्पिटलचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारकात झालेल्या नजराणा हास्याचा कार्यक्रमात हास्य- अभिनयाच्या अविष्काराने नगरकर लोटपोट झाले. प्रसिद्ध नाट्य सिने अभिनेत्री स्मिता ओक व विनोदवीर दिलीप हल्याळ यांचा विनोदी कार्यक्रम रावसाहेब पटवर्धन स्मारकात रंगला होता. श्रीदीप हॉस्पिटल क्रिटीकल केअर अ‍ॅण्ड ट्रॉमा युनिटच्या वतीने सर्व नागरिकांसाठी निशुल्क कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.


या कार्यक्रमासाठी डॉ. अमित बडवे, डॉ. सचिन घुले, डॉ. सतीश सुपेकर, डॉ. आशितोष जोशी, डॉ. गणेश झरेकर, डॉ. किशोर खरड, डॉ. गणेश गव्हाणे, डॉ. मीरा बडवे, डॉ. अंजू घुले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


स्मिता ओक व दिलीप हल्याळ यांनी पती-पत्नीच्या अवखळ स्वभावाची वैशिष्टये अलगदपणे उलगडून दाखविणारा द्विपात्री प्रयोग सादर केला. हसण्याने आयुष्य वाढते, पण सध्या धावपळीच्या युगात माणूस हसणे विसरत चालला असल्याचे स्पष्टीकरण देत त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. फ्लॅट संस्कृती…, नाच बसंती नाच… आणि गाण्याचे विडंबन करून प्रेक्षकांना मनमुराद हसविले. हलकेफुलके करणारे मजेशीर चुटकुल्यांचा आविष्कार घडविला. विविध विनोदातून सामाजिक प्रश्‍नांवर बोट दाखवून प्रेक्षकांना चिंतन करण्यास भाग पाडले. जीवनाची गुरुकिल्लीचा संदेश देत, त्यांनी आरोग्याचे गुपितही उलगडले.


एखाद्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य शिबीर ऐवजी हास्याचा झालेला कार्यक्रम नागरिकांना चांगलाच भावला. डॉ. आशितोष जोशी यांनी संपूर्ण गुडख्यांची रिप्लेसमेंट सर्जरी व तात्पुरत्या स्वरूपाच्या शस्त्रक्रियेची माहिती दिली. तर तात्पुरत्या स्वरूपाची गुडघ्यांची शस्त्रक्रिया जास्त टिकणारी व नैसर्गिक जाणीव करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, डॉ. सिमरन वधवा, दिलीप कुलकर्णी, डॉ. अनघा पारगावकर, प्रशांत मुनोत, प्रिया मुनोत, प्रिया बोरा आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीदीप हॉस्पिटलच्या सर्व सहकारी वर्गाने परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *