निकृष्ट जेवण, अस्वच्छता व गैरसोयीची रिपाई मराठा आघाडीची तक्रार
सेवा देण्यास असक्षम ठरणार्या एसटी बसच्या अधिकृत हॉटेल थांब्याचे परवाने रद्द करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे महामार्गावरील चास व पारनेर मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकृत बस थांब्याच्या हॉटेलमधील निकृष्ट जेवण, अस्वच्छता व गैरसोयीमुळे सर्वसामान्य प्रवाश्यांची कुचंबना होत असल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

या तक्रारीचे निवेदन प्रदेश संघटक सिद्धार्थ सिसोदे यांनी परिवहन महामंडळाचे प्रधान सचिव, अन्न औषध प्रशासन व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव तसेच जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नगर-पुणे महामार्गावरील पारनेर व चास येथे प्रवाश्यांच्या सुविधेसाठी हॉटेलवर अधिकृत बस थांबे तयार करण्यात आले आहेत. परंतु या बस थांब्यावर प्रवाशांना निकृष्ट पद्धतीचे नाश्ता-जेवण मिळत आहे. तर परिसरात अत्यंत अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून, स्वच्छतागृह देखील नीटनेटके नसल्याचा आरोप रिपाईच्या मराठा आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.

प्रवाश्यांना बसमधून उतरल्याबरोबर दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या थांब्यावर प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत असून, अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बस थांब्यावरील स्वयंपाक गृह, शौचालय परिसराची स्वच्छता, जेवणाचा दर्ज्जा व शुद्धता याची वेळोवेळी चाचणी करावी, सरकारी नियमांचे गैरवर्तन करणार्या या बस थांब्याच्या हॉटेलवर कारवाई करुन, त्यांचे अधिकृत थांब्याचे परवाने रद्द करण्याची मागणी रिपाई मराठा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.