कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी डोंगरे यांचे प्रयत्न अभिमानास्पद -बाबासाहेब महापुरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, लेखक प्रा. गणेश भगत, प्रा. संजय आखाडे, पल्लवी गायकवाड आदी उपस्थित होते.
बाबासाहेब महापुरे म्हणाले की, ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी पै. नाना डोंगरे यांचे सातत्याने सुरु असलेले प्रयत्न अभिमानास्पद आहे. त्यांनी नव्याने स्थापन केलेल्या नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून खेळाडूंना फायदा होणार आहे. कुस्ती खेळाच्या विकास व प्रचार-प्रसारासाठी कुस्तीगीर संघाच्या कार्यास सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, शहरी व ग्रामीण भागात कुस्ती स्पर्धांचे आयोजन करून युवकांमध्ये खेळाडूवृत्ती वाढीस लागण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली आहे. कुस्तीबरोबरच इतर मैदानी खेळ देखील खेळविण्यात येणार आहे. कुस्तीमध्ये उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याचा कुस्तीगीर संघाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांनी डोंगरे यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.