इंडिया अगेन्स्ट तमस् स्लेव्हरी संघटनेचा आरोप
निरंतर राष्ट्रीय कर्तव्ययोग स्विकारण्याचे जनतेला आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतात धर्माच्या नावावर झुंडशाही राबवून आणि बहुमताचा वापर करुन देशातील धर्मनिरपेक्षता संपविली जात असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट तमस् स्लेव्हरी या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. मागच्या दाराने देशात कौरवशाही लादण्याचा प्रयत्न सुरु असून, याचा कायम बिमोड करण्यासाठी या संघटनेने गीताभारतातील निरंतर राष्ट्रीय कर्तव्ययोग आणि तमस् चेतनेतून उन्नत चेतनेचा स्विकार करण्याचा आग्रह धरण्यात आला असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
दुसर्या महायुध्दामध्ये पेनिसिलिनचा वापर केल्यामुळे हजारो सैनिकांचे प्राण वाचविण्यात आले. त्यातून मित्र राष्ट्रांना दुसर्या महायुध्दात यश मिळाले याच तंत्राचा वापर भारतातील संसदीय लोकशाहीमध्ये करण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला आहे. देशभरात व्होट माफिया मतदारांना पैसे, दारु, कोंबडी आणि जातीचा वापर करुन मतं मिळवितात आणि त्यातून सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारतात. यासाठी जय शिवाजी जय डिच्चूकावा या तंत्राचा वापर या संघटनांनी सुरु केला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पेनिसिलिनमध्ये ज्या रोगजंतूमुळे आजार होत होता, त्याच जंतूंच्या माध्यमातून लस तयार करुन असा रोग कायमचा संपविण्यात आला. गीताभारत हा धर्मग्रंथ नसून क्रांतीकारक मानसशास्त्र आणि तत्वज्ञान आहे. गीताभारताच्या मदतीने देशातील धर्मनिरपेक्षता टिकविता येईल, वाढविता येईल आणि धर्माच्या नावावर देशव्यापी सुरु असलेली झुंडशाही कायमची मोडीत काढता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान श्रीकृष्णांची उन्नत चेतना आणि अर्जुनाचे शौर्याचे गुण गीतेतून आत्मसात केले. त्यातून समाज कंटकांविरुध्द डिच्चूकावा केला. याचा वापर मतदारांनी संपूर्ण देशात करण्याची गरज आहे. पैसे देऊन जो व्होट माफिया आपल्याला विकत घेऊ पाहत आहे, तो देशाला लुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मतदारांनी भारतीय संविधानाची शपथ घेऊन व्होट माफियाचा डिच्चूकावा करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
संसदीय लोकशाहीतून अशा धनदांडग्यांना कायमचे डब्यात टाकले पाहिजे. त्यामुळे गीताभारत आणि जय डिच्चूकावा या दोन तंत्राच्या वापराने देशातील लोकशाहीला लागलेला लोककर्कासूरांचा आणि न्याय कर्कासूरांचा कॅन्सर कायमचा संपविता येणार आहे. डिच्चूकावा तंत्रामुळे देशातील न्याय संस्थेत न्याय खरेदी विक्री करणार्या न्याय कर्कासूरांचा सुध्दा कायमचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. घराघरात, देशभरात आणि लोकमनात उन्नत चेतना प्राप्तीचा मार्ग या संघटनांनी जनतेसमोर ठेवला असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या चळवळीसाठी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. मेहबुब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.