कारखानदार, भांडवलदार व कामगार ठेकेदारांकडून श्रमिक कामगारांचे शोषण -रावसाहेब काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वच क्षेत्रातील कामगारांच्या न्याय, हक्कासाठी काम करणाऱ्या धडक जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीधर शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे जनरल सेक्रेटरी रावसाहेब काळे यांनी शेलार यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला. यावेळी कायदेशीर सल्लागार ॲड. महेश शिंदे, सैनिक जनकल्याण पार्टीचे कार्याध्यक्ष पोपट दाते, बाबू काकडे, डॉ. संतोष गिऱ्हे, तनीज शेख, चंद्रकांत पाटोळे आदी उपस्थित होते.
रावसाहेब काळे म्हणाले की, कामगारांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी धडक जनरल कामगार संघटना कार्य करत आहे. कारखानदार, भांडवलदार व कामगार ठेकेदार एकत्रितपणे श्रमिक कामगारांचे शोषण करत आहे. त्यांना कामगार कायद्याप्रमाणे लाभ दिला जात नाही. त्यांच्या प्रश्नाकडे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे देखील दुर्लक्ष आहे. कामगार कायदे अमलात आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु आहे. समान काम समान वेतन, भविष्य निर्वाध निधी व पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी संघटना प्रयत्नशील असून, अनेक कंपन्यांकडून कामगारांची माहिती लपविण्यात येत आहे. उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्षापासून कार्यरत कामगारांना कायम करुन घेतले जात नसल्याने याबाबत देखील मोठे आंदोलन उभारले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नूतन जिल्हाध्यक्ष शेलार यांनी जास्तीत जास्त कामगारांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन दिली जाणार आहे. सर्वच क्षेत्रातील कामगारांना संघटित करुन कामगारांच्या ज्वलंत प्रश्नावर आंदोलन छेडले जाणार आहे. यासाठी कामगारांची नोंदणी लवकरच सुरु करणार असल्याची त्यांनी माहिती दिली. तर जिल्हाभर संघटना वाढविण्यासाठी कार्यकारणी जाहीर करुन कामगार क्षेत्रात काम करणाऱ्यांना विविध पदाच्या माध्यमातून संधी दिली जाणार असल्याचे सांगितले.
