दिल्लीगेट वेस समोर निदर्शने
हिंदू हितासाठी व संरक्षणासाठी सरकार चालवण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात हिंदू जनसमुदायावर होत असलेल्या हल्ल्याचा व नुकतेच उत्तर प्रदेश मधील बरेली मध्ये कावड मिरवणुक व मेवात येथे भगवा यात्रेत जिहादी प्रवृत्तींकडून झालेल्या हल्ल्याचा राष्ट्र निर्माण पार्टीच्या वतीने शहरातील दिल्लीगेट वेस समोर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्कर्ष गीते, नील गांधी, वैभव रासने, अमोल भंडारे, योगेश राऊत, मुनोत आदी उपस्थित होते.
मणिपूरमध्ये मध्ये सुरु असलेल्या हिंसाचार विरोधात पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान एका महिलेवर अमानुष प्रवृत्तीने हल्ला करण्यात आला. तर उत्तर प्रदेश मधील बरेली मध्ये कावड यात्रेदरम्यान जिहादी मनोवृत्तीच्या लोकांनी दगडफेक केली. धर्म यात्रेवर भ्याड हल्ला करुन धार्मिक स्थळांचे नुकसान करण्यात आले. दिल्लीमध्ये मोहरमच्या दिवशी नांगोळी स्टेडियममध्ये घुसण्याच्या हट्टापायी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला. तर विश्व हिंदू परिषद व मातृशक्ती दुर्गा वाहिनी यांच्या वतीने ब्रिजमंडल (भगवा यात्रा) यात्रेवर गोळ्या चालवण्यात आल्या हे सर्व हल्ले जिहादी प्रवृत्तीतून झाले असल्याचा आरोप राष्ट्र निर्माण पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर परवानगी घेऊनही हिंदू भाविकांवर हल्ले होत आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात अबू आझमी हे आमदार वंदे मातरम म्हणणार नसल्याचे विधान करत असल्याचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला. तर केंद्र व राज्य सरकारने हिंदू हितासाठी व संरक्षणासाठी सरकार चालवावे, हिंदूवर दाखल होणारे ॲट्रोसिटीचे गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्र निर्माण पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.