डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयाचा उपक्रम
अपत्कालीन बचावाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या हॉस्पिटल व परिचर्या महाविद्यालयातील परिचारिकांना आपत्कालीन बचाव प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिकासह धडे देण्यात आले. काही दुर्घटना घडल्यास रुग्ण व इतर व्यक्तींचे जीव वाचविण्याचे प्रशिक्षण परिचारिकांना देण्यात आले.
डॉ. सतीश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक, परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
नुकतेच झालेल्या या एक दिवसीय प्रशिक्षण वर्गात विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या 30 परिचारिका आणि परिचर्या महाविद्यालयातील 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. डॉ. सतीश मोरे यांनी आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी व त्याचे नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.
प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर यांनी आपत्कालीन परिस्थिती दरम्यान परिचारिकांची भूमिका व त्याचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून उपप्राचार्य डॉ. योगिता औताडे, सहयोगी प्राध्यापक अमोल टेमकर, सहाय्यक प्रा. अमोल शेळके, प्रशांत अम्रित आदी उपस्थित होते. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा व मार्गदर्शन होवून सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी आपत्कालीन बचाव प्रशिक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक सादर केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे संचालक प्रा. डॉ. अभिजीत दिवटे, परिचर्या अधिक्षक रेबेका सालवे,आपात्कालीन मेडिकल ऑफिसर, विभाग डॉ. मयूरी वाळूंज, तसेच सेक्युरिटी, फायरसेफ्टी विभाग यांचे सहकार्य लाभले.
