जिल्हाधिकारी यांचा निर्णय
अनाधिकृत अतिक्रमण प्रकरण भोवले
अहमदनगर (प्रतिनिधी)- जामखेड तालुक्यातील मौजे वाघा ग्रामपंचायतीचे सदस्य संदिपान बापुराव बारस्कर यांनी ग्रामपंचायतीची परवानगी न घेता शासकीय अनुदानाचा लाभ घेऊन ग्रामपंचायत मालकीचा गट नं. 313 मध्ये घर शौचालयाचे बांधकाम करुन अतिक्रमण केले. याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चौकशी करुन बारस्कर यांना अपात्र केले आहे.
यासंदर्भात कांतीलाल श्रीमंत जगदाळे यांनी ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केला होता. तसेच सचिन सुभाष साळवे यांनी वाघा ग्रामपंचायतीचे सदस्य सूर्यभान दशरथ साळवे याच्या विरुध्द ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केला. सुर्यभान साळवे यांनी ग्रामपंचायत मालकीचा गट नं. 313 मध्ये बेकायदेशीरपणे बांधकाम व वॉल कंपाऊंड, शौचालय बांधून शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्यामुळे त्यांना देखील अपात्र घोषित करण्यात आले आहे.
तसेच सोनाली उमेश बारस्कर यांनी वाघा ग्रामपंचायतीचे सदस्य आरती शिवाजी बारस्कर यांच्या विरोधात ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल करुन आरती बारस्कर यांनी ग्रामपंचायत मालकीच्या गट नं. 233 मध्ये बेकायदेशीर रित्या कांदा चाळ उभारुन शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी यांनी सदरील तिनही ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र म्हणून घोषित केलेले आहे. सदर ग्रामपंचायत विवाद अर्जाच्या कामी अर्जदार यांच्या वतीने अॅड. गजेंद्र दशरथ पिसाळ यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. विशाल पांडूळे व अॅड. अच्युत भिसे यांनी सहकार्य केले.