अहमदनगर महानगरपालिका कृती समितीचा इशारा
पहिल्यांदा बाबासाहेबांचा पूर्ण आकृती पुतळा उभारा; सफाई कर्मचार्यांची पिळवणूक व वारसांना नोकरीपासून डावलले जात असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिका कृती समितीची बैठक सिद्धार्थ नगरला नुकतीच पार पडली. या बैठकीत सफाई कर्मचार्यांची होणारी पिळवणूक, वारसांना नोकरीपासून डावलले जात असल्याचे व शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण आकृती पुतळा अद्यापि उभारला गेला नसल्याने त्यांच्या जयंती दिनी 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास मनपा आयुक्त व महापौरांना अभिवादन करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीसाठी कर्मचारी कृती समितीचे मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक अनिल शेकटकर, मातंग समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान जगताप, श्रीरंग आडागळे, कृती समिती अध्यक्ष शकुंतला साठे, उपाध्यक्ष लखन गाडे, सचिव संजय साठे, शरद भालेराव, साहेबराव पाचारणे, विजय सिरसाठ, सुनिल सकट आदींसह महापालिका सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षितांची चळवळ चालवून त्यांना न्याय देण्याचे काम केले. मात्र महापालिकेत उपेक्षित घटक असलेले सफाई कर्मचारी यांची पिळवणूक सुरु असून, त्यांच्या वारसांना नोकरीपासून डावलले जात असल्याने महापालिकेचे आयुक्त व महापौरांना बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला आहे. तर त्यांना अभिवादन करण्यापासून रोखले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
14 एप्रिल भाररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी त्यांचा पूर्ण आकृती पुतळ्याचे शहरात अनावरण करण्यात यावे, महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बहुल नागरी वस्तीत स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, मुस्लिम कर्मचार्यांना रमजाननिमित्त सानुग्रह अनुदान व आगाऊ रक्कम देण्याची व्यवस्था करावी, 24 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून 75, 506, 305 पात्र लाभार्थ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नोकरीत सामावून घ्यावे, शरद वाढता जातीय आणि धार्मिक तणाव दूर होण्यासाठी उपाययोजना कराव्या, महापालिका स्थापना स्थित मनपा मागासवर्गीय कक्षात स्वतंत्र कामगारांची नेमणूक करण्यात यावी, सफाई कर्मचार्यांचे सर्व कार्यालयीन कामकाज या कक्षात विलीन करावे, वीस वर्षे धिम्या प्रकारे कामगारांची प्रकरणे हाताळणार्या कर्मचार्यांची आस्थापन विभागात इतरत्र बदली करण्याची मागणी अहमदनगर महानगरपालिका कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.