• Wed. Mar 12th, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती किमान समान देश सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय

ByMirror

Apr 2, 2023

इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटना शुक्रवारी दिल्लीगेट वेस समोर ठेवणार प्रस्ताव

देशाच्या प्रगल्भ लोकशाहीचे बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठीचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला स्मरण करुन इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेच्या वतीने त्यांची जयंती किमान समान देश सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शुक्रवारी (दि.7 एप्रिल) सकाळी 11 दिल्लीगेट वेस समोर याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. देशाच्या प्रगल्भ लोकशाहीचे बाबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी या अभियानात सर्व नागरिकांच्या सहभागी करुन घेण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.


किमान समान देश सेवा अभियानात जन लोकभज्ञाक मतफत्ते आणि गुट्टलबाज सत्तापेंढार्‍यां विरुध्द डिच्चुफत्ते याला सर्वात वरचा दर्जा देण्याचा आग्रह संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर 73 वर्षे संपली, परंतु देशात भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचे कारण देशातील निवडणुकांमध्ये होणारा भ्रष्टाचार सर्वात मोठे कारण आहे. गुट्टलबाज सत्तापेंढारी मागच्या दाराने सत्ता मिळवितात. त्यासाठी मतं खरेदी करणे, जाती धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल करून मत मिळवणे आणि ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग करून बहुमत मिळाल्याचे दाखविण्यासाठी सत्ता पेंढार्‍यांचा प्रयत्न राहिला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रश्‍न सोडविण्याचे व काम करण्याची आस्था असलेल्या तसेच निरंतर राष्ट्रीय कर्तव्य करत करणार्‍या उमेदवाराला लोकसभा, विधानसभामध्ये मत देऊन निवडून आणले पाहिजे. गुट्टलबाज सत्तापेंढारी विरुध्द डिच्चूकावा करुन अशा सत्ता पेंढार्‍यांविरुध्द डिच्चूफत्ते करण्याचा संघटनेचा आग्रह आहे.


इंग्रजांना या देशातून हाकलून लावल्यानंतर गुट्टलबाजे सत्तापेंढारी यांनी गेली अनेक वर्षे सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला. त्याचबरोबर देशातील 90 टक्के राजकीय पक्ष अशा सत्तापेंढार्‍यांचा वापर करत आलेले आहे. त्यामुळे स्वातंत्र्याची फळे गेल्या 75 वर्षात सामान्य माणसांना मिळालेली नाहीत. देशातील लाखो धनाढ्य लोकांकडे शहरी भागातील शेकडो एकर जमिनीची मालकी ताब्यात आहे. परंतु बेघरांना राहण्यासाठी घरे नाहीत, बेरोजगारी वाढली आहे. कायद्याचा वापर समाजातील जात संपवण्यासाठी, विषमता संपवण्यासाठी व आर्थिक न्याय देण्यासाठी खर्‍या अर्थाने करता येतो, परंतु सध्याच्या सत्ताधार्‍यांकडे उन्नतचेतनेचा अभाव असल्यामुळे देशात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार हे नपुंसक असल्याचे जाहिरपणे स्पष्ट केले. कारण धर्माच्या, जातीच्या नावावर भडक भाषणे करणार्‍यांवर सरकारने काही एक कायद्याचा बडगा उगारला नाही. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी धर्माच्या नावावर जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी अशा धर्मवेढाविरुद्ध कारवाई करत नाही. यामुळेच राज्यात जातीय दंगली उसळण्याचे प्रकार घडत असल्याचे म्हंटले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे कलम 326 अन्वये देशातील प्रौढ मतदारांना चांगल्या उमेदवारांसाठी मतफत्ते व समाज विघातक उमेदवार विरोधात डिच्चूफत्ते या दोन महत्त्वाचे अधिकार दिले आहेत. याचा प्रभावी वापर करण्यासाठी किमान समान देश सेवा अभियान चालवले जाणार आहे. यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, कैलास पठारे, सुधीर भद्रे, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *