• Wed. Oct 15th, 2025

डॉन बॉस्को सोसायटीचा सामाजिक न्याय भवनावर जन आक्रोश मूक मोर्चा

ByMirror

Jul 27, 2023

मणिपूर हिंसाचार व महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध

देशात स्त्रियांवर होणारे अत्याचार त्वरित थांबण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मणिपूर राज्यातील हिंसाचार व तीन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ डॉन बॉस्को अहमदनगर सोसायटीच्या वतीने गुरुवारी (दि.27 जुलै) सावेडी येथील सामाजिक न्याय भवनावर जन आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला.


सावेडी येथील डॉन बॉस्को शैक्षणिक संकुल येथून मोर्चाला प्रारंभ झाले. यामध्ये शैक्षणिक संकुलातील पालक, परिसरातील नागरिक, सर्व धर्मीय बांधव, महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांवरील अत्याचार थांबवा, मुलींना जगू द्या, मणिपूर मध्ये झालेला हिंसाचार व बलात्काराचा निषेध नोंदविणारी फलक हातात घेऊन हा मोर्चा निघाला होता. सर्वांनी तोंडाला काळ्या मुखपट्टया लावल्या होत्या. तर महिला व युवतींनी काळा पोशाख परिधान करुन आपला निषेध व्यक्त केला.
नगर-मनमाड मार्गे हा जन आक्रोश मूक मोर्चा सामाजिक न्याय भवनावर धडकला. यावेळी फादर रिचर्ड डिसिल्वा, फादर जेम्स तुस्कानो, ब्रिस्टन ब्रिटो, रिचर्ड बुरखाव, जॉर्ज दिॲब्रिओ, फ्रान्सिस पाटोळे, शिल्पा वैजापूरकर, ॲन्थोनी पाटोळे, शैला मिसाळ, नितीन गायकवाड, योसेफ शेळके आदींसह ऑक्झिलियम व सेक्रेटहार्डचे सिस्टर्स उपस्थित होते. या प्रमुखांच्या उपस्थितीत मागण्यांचे निवेदन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कार्यालयाच्या अधीक्षिका सावित्रा लबडे यांना देण्यात आले.


मणिपूर राज्यात मागील 85 दिवसापासून सामाजिक हिंसाचार व स्त्रियांवर अत्याचार सुरु आहे. अनेकांची घरे जाळली जात आहे. स्त्रियांना विवस्त्र करून त्यांची विटंबना केली जात आहे. त्यामुळे देशातील सामाजिक ऐक्य, स्त्री-पुरुष समानता ही मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. त्यासाठी सरकारने आणि प्रशासनाने त्वरित लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी. ज्यांच्यावर अत्याचार आणि अन्याय झालेला आहे, त्यांना त्वरित न्याय मिळावा. अशा घटनांची पुनरावृत्ती देशात होऊ नये. तसेच समाजामध्ये जनजागृती करुन स्त्रियांचा योग्य तो सन्मान करावा, त्यांना निर्भयपणे जगता यावे यासाठी उपाययोजना करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


देशात स्त्रियांवर होणारा अत्याचार त्वरित थांबवावा, महिला अत्याचार प्रतिबंधासाठी कठोर पावले उचलावी, मणिपूरच्या विघातक शक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रतिबंध करावा, समाजकंटक व हिंसाचारी प्रवृत्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी, मणिपूर हिंसाचारात बळी गेलेल्यांना तात्काळ न्याय मिळावा, गुन्हेगारांचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे, धार्मिक व शैक्षणिक संस्थांची झालेली नुकसान भरपाई सरकारने करावी, हिंसाचारात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा पुरवून त्यांचे पुनर्वसन करावे, यापुढे देशात सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, यासाठी भारत सरकारने संविधानिक दृष्टया पावले उचलावी, यासारख्या घटना देशात पुन्हा होणार नाही याचे केंद्र सरकारने जनतेला ठोस आश्‍वासन द्यावे,

मणिपूर राज्यातील सर्वसामान्य जनतेचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्या, समाजात धार्मिक, सामाजिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रक्षोभक वक्तव्यावर कठोर प्रतिबंध घालावे, मणिपूरला हिंसाचाराच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला त्वरित बरखास्त करण्याची मागणी डॉन बॉस्को अहमदनगर सोसायच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *