विद्यार्थ्यांनी नेहमीच नवनवीन कौशल्य आत्मसात करावे -मनोज कोतकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उन्हाळी शिबिरातंर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक मनोज कोतकर, उद्योजक जालिंदर कोतकर, मुख्याध्यापक संदीप भोर, विशाल कळमकर, प्रमिला लोखंडे, सुवर्णा दाणी, रुकय्या शेख, ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे आदींसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. प्रसाद जमदाडे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना या शिबाराच्या माध्यमातून वाव देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेहमीच नवनवीन कौशल्य आत्मसात करावे. स्पर्धेच्या युगात शालेय शिक्षणाबरोबर विविध कला-कौशल्य शिकण्यासाठी उन्हाळी शिबिर महत्त्वाच्या भूमिका बजावत आहे. अशा शिबिरांमधून विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा विकास साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले.