• Thu. Mar 13th, 2025

जेएसएसच्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराने जिंकली मने

ByMirror

Mar 28, 2023

निसर्गरम्य वातावरणात रंगले स्नेहसंमेलन

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षणाला संस्काराची जोड आवश्यक -अ‍ॅड. नरेश गुगळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षणाला संस्काराची जोड आवश्यक आहे. शाळांमधून शिक्षण मिळते, पण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना संस्काराची गरज निर्माण झाली आहे. तर मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी मैदानी खेळाकडे लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. नरेश गुगळे यांनी केले.


केडगाव येथील जेएसएस गुरुकुलच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी अ‍ॅड. गुगळे बोलत होते. हे स्नेहसंमेलन रानवारा या निसर्गरम्य ठिकाणी उत्साहात पार पडले. याप्रसंगी सचिन कटारिया, सारिका कटारिया, विजय भळगट, प्राचार्य आनंद कटारिया, प्राचार्या निकिता कटारिया आदी उपस्थित होते.


अ‍ॅड. गुगळे म्हणाले की, जेएसएस गुरुकुल वर्षभरात सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य करत आहे. तर शालेय जीवनात गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना महत्त्व देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांनी फक्त क्रिकेटकडे न वळता फुटबॉल, टेनिस आदी मैदानी खेळांकडे वळायला हवं. शाळांनीही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात प्राचार्य आनंद कटारिया म्हणाले की, शाळेत अभ्यास पूर्ण होणे महत्त्वाचे असल्याने शाळेच्या शेवटच्या टप्प्यात स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. स्नेहसंमेलनातील सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळत असतो. विद्यार्थी व्यासपीठावर उभा राहिला, तर तो भविष्यात व्यासपीठावर येण्यास घाबरणार नाही. शालेय जीवनातील विविध उपक्रमामुळे त्यांच्या जीवनात बदल घडत असतो. परिपूर्ण विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने जेएसएस गुरुकुलची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सचिन कटारिया व सारिका कटारिया यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्गात प्रथम येणार्‍यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र दरवर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा केली.


स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी तांडव, पावनखिंड, हॉरर, रोबोट यासोबतच क्रिकेट, डिस्को डान्सर, आयला रे, देशभक्तीवर आर्मी गीत, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, आई जगदंबे अशा अनेक गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले. या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित नागरिक व पालक वर्ग मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. काही गीतांवर विद्यार्थी ट्रॅक्टर, बुलेट व लोटगाडीवर एन्ट्री करताच संपूर्ण कार्यक्रमात चैतन्य संचारले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *