विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळा व संगीत कार्यक्रमाचा महिलांनी लुटला आनंद
महिलांनी महिलांसाठी चालवलेली चळवळ शहरात रुढ होत आहे -नमिता फिरोदिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जिव्हाळा ग्रुपच्या वतीने मारवाडी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये महिलांसह युवतींनी सहभाग नोंदविला. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा, रॅम्प वॉक, मनोरंजनात्मक खेळ व संगीत कार्यक्रमाचा महिलांनी आनंद लुटला.
महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविणार्या जिव्हाळा ग्रुपच्या तिसर्या स्थापना दिनानिमित्त हॉटेल राजयोगमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक मारवाडी वेशभूषेत नटून आलेल्या महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नमिता फिरोदिया, डॉ. वर्षा कोर्टीकर, श्रद्धा बिहाणी, जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा, सचिव सविता काळे आदी उपस्थित होत्या.
अल्पना कासवा यांनी प्रास्ताविकात ग्रुपच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत सविता काळे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला मनीषा बोगावत, अर्चना गुंदेचा, निर्मला परभाने, जरीना जुबेर, अर्चना फिरोदिया यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

नमिता फिरोदिया म्हणाल्या की, महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य जिव्हाळा ग्रुप करत आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेली चळवळ शहरात रुढ होत आहे. यामुळे महिलांचा सर्वांगीन विकास साधला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. वर्षा कोर्टीकर यांनी महिलांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन निरोगी राहून कुटुंबाचे आरोग्य जपण्याचा सल्ला दिला.
संगीत कलाकार जुबेर यांचा आर्केस्ट्राचा कार्यक्रम यावेळी रंगला होता.
अश्विनी जैन यांनी महिलांसाठी विविध स्पर्धा व मनोरंजनात्म खेळ घेतले. मारवाडी वेशभूषेत आलेल्या महिलांनी रॅम्प वॉक केला. या स्पर्धेत प्रथम- मोनिका वर्मा, द्वितीय- रुपाली मुनोत, तृतीय- योगिता कडू, उत्तेजनार्थ- इरा देवकाते ठरल्या. या विजेत्या महिलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तर यावेळी सोडत मधील भाग्यवान विजेत्यांना देखील बक्षिसे देण्यात आली. बक्षिसांमध्ये घड्याळ, चांदीचे जोडवे व साडीचा समावेश होता. बक्षिसांसाठी बजरंग काशिनाथ गुरव ज्वेलर्स व लक्ष्मी फॅशन यांचे प्रायोजकत्व लाभले.
