• Thu. Mar 13th, 2025

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाणी बॉटल भेट

ByMirror

Mar 27, 2023

शालेय परीक्षा व उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्या फाउंडेशनचा उपक्रम

शिक्षण सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असून, गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची गरज -कावेरी कैदके

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहिल्या फाउंडेशन व नेहरु युवा केंद्राच्या वतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पिण्याच्या पाण्याची बॉटल भेट देण्यात आली. नुकतेच सुरु झालेल्या शालेय परीक्षा व उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद शाळा खंडोबावाडी, करंजी (ता. पाथर्डी) येथे हा उपक्रम राबविण्यात आला.


रणरणत्या उन्हात परीक्षेला येताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाणी बॉटल मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद व समाधान फुलले होते. या कार्यक्रमासाठी अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्षा कावेरी कैदके, सचिव सुवर्णा कैदके, सदस्य वैशाली शिपनकर, रागिनी शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक मोहन घोरपडे, प्रशांत हळगावकर, उर्मिला शिपनकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र नागरे, महिला पालक समितीच्या अध्यक्षा मनीषा नजन, भागुबाई भांड, कुलदीप आगाशे, विजय भांड, अर्जुन भिटे, गवते, तुळशीराम भांड, शीतल हजारे, अनिता शीपनकर, शीला नगरे, सावित्रीबाई हजारे, आसाराम चव्हाण, नीता पवार, अंगणवाडी सेविका राधिका भांड, स्मिता पवार, जयश्री हजारे, संगीता आगाशे, सोशल सेंटर अहमदनगर ऑर्गनायझेशनच्या सीमा सरोदे आदींसह खंडोबावाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फाउंडेशनच्या अध्यक्षा कावेरी कैदके म्हणाल्या की, सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असून, समाजाच्या विकासासाठी गरजू घटकांना शिक्षणासाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांना आधार देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


मुख्याध्यापक मोहन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांची गरज ओळखून अहिल्या फाउंडेशनने घेतलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारे शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात आल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने विजय भांड यांनी फाऊंडेशनचे आभार मानले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्रा जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *