स्थानिक प्रश्नांवर कारवाई करून ते तातडीने सोडविण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचार्यांच्या प्रश्नावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या अध्यक्षतेखाली कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम, माध्यमिक शिक्षण विभाग, समाज कल्याण, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीप्रसंगी यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, राज्य कोषाध्यक्ष किशोर राजगुरू, विभागीय अध्यक्ष ना.म. साठे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, सुहास धीवर, नीता देठे, दिलीप कसबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत रिक्त पदांचा आढावा घेऊन नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, डीसीपीएस मधील रकमांचा ताळमेळ घालून एमपीएसमध्ये शासन व कर्मचारी हिस्सा जमा करण्यात यावा, कर्मचार्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, कर्मचार्यांचे स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे, अनुकंपा तत्त्वावर नोकर भरती प्रक्रिया राबवावी, मैल कामगार यांचे वेतन वेळेवर व्हावे, प्रत्यक्षात जमा रकमेच्या स्लीपा वेळेवर मिळाव्या, मैल कामगारांना घोंगड्या वाटप करण्यात याव्या, सहाय्यक परिचारिका प्रसाविका यांच्या वयाची 50 वर्षे पूर्ण झालेले प्रशिक्षणातील सुट्टीचे लाभाचे आदेश निर्गमित व्हावे, आश्वासित प्रगती योजना सहाय्यक परिचारिका प्रसारिका यांना दुसरा लाभ प्रशिक्षण सुट्टीनंतर तात्काळ लागू करावा, 30 तीस वर्षे आरोग्य सेविका पदावर सेवा पूर्ण झाल्याने वरिष्ठ पदाची वेतन संरचना लागू व्हावी सेवा जेष्ठ आरोग्य सेविकांचा 2022 च्या प्रशिक्षणासाठी डावलण्यात आले असून, यावर कारवाई व्हावी व आश्वासित प्रगती योजनेचे 10, 20, 30 चे लाभ देण्यात यावे अथवा पदाची पदोन्नती मिळावी या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष के.के. जाधव यांनी विविध विभागातील प्रश्न मांडले.
या सर्व प्रश्नांवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर कारवाई करून ते तातडीने सोडविण्याची आश्वासन दिले. जिल्हा परिषदेत रिक्त पदांवर नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर समाज कल्याण विभागातील मंजूर वैद्यकीय देयके व मे 2022 ची थांबवलेले वेतन तात्काळ देण्यासाठी चौकशी बसविण्यात येत असल्याची माहिती दिली. कर्मचार्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करुन ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल कोहिणकर यांचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आभार ना.म. साठे यांनी मानले.
