प्रशिक्षिका व प्रशिक्षणार्थी महिला व युवतींचा सहभाग
महिलांनी स्वत:मध्ये क्षमता निर्माण करून सक्षम व्हावे -एस.एस. रोटीवाले
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी स्वत:मध्ये क्षमता निर्माण करून सक्षम व्हावे. क्षमता निर्माण होण्यासाठी व्यावसायिक शिक्षण काळाची गरज बनली आहे. वेळेचे नियोजन करून महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचे आवाहन पारनेर आयटीआय महाविद्यालयाचे एस.एस. रोटीवाले यांनी केले.
भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जनशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय क्षमता बांधणी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना रोटीवाले बोलत होत्या. यावेळी संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे आदी उपस्थित होते.

पुढे रोटीवाले म्हणाल्या की, व्यावसायिक प्रशिक्षण घेतल्यानंतर शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळते. भांडवल नसले तरी, स्वत:चा व्यवसाय उभा करता येऊ शकतो. व्यवसाय करण्यासाठी कष्ट घेऊन जिद्दीने मेहनत करण्याची तयारी ठेवावी. जनशिक्षण संस्थेचे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तर कॉस्मेटोलॉजीच्या अद्यावत सौंदर्य तंत्रज्ञानाची माहिती दिली.
प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात 35 हजार महिला, युवती व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात आले. ग्रामीण भागात देखील गावी-गावी जाऊन प्रशिक्षणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. जनशिक्षण संस्था कौशल्यक्षम भारत घडविण्यासाठी योगदान देत आहे. अद्यावत प्रशिक्षणाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कमल पवार म्हणाल्या की, महिलांनी पारंपारिक ब्युटी पार्लर, शिवणकाम प्रशिक्षणाबरोबर उद्योगशील प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन आदी प्रशिक्षण घेऊन स्वतःचा विकास करण्याची गरज आहे. कौशल्य विकसित केल्यास आत्मनिर्भर होता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यशाळेत संस्थेतील प्रशिक्षिका ममता गड्डम, स्मिता बडाख, स्नेहल गीते, रंजना केदारे, हिराबाई गायकवाड, जिनत शेख, रेणुका कोटा, पूजा तागडकर, मंगल चौधरी, सुदर्शना पवार, जयश्री नन्नवरे, कांचन दायतोडे, नाझिया शेख, कल्याणी जायभाय आदी प्रशिक्षकांसह प्रशिक्षणार्थी युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर पारनेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थी युवतींनी जन शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन सुरु असलेल्या विविध व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग व उपक्रमाची माहिती घेतली. गड्डम यांनी उपस्थितांना गरारा पॅटर्न शिकविला तर इतर प्रशिक्षिकांनी देखील विविध कला-गुणांचे सादरीकरण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले. आभार शफाकत सय्यद यांनी मानले.