पै. संदिप डोंगरे व पै. शिवराज कार्ले याची चितपट कुस्ती ठरली प्रेक्षणीय
डाव-प्रतिडावाची मल्लांनी दाखवली उत्कृष्ट खेळाची चुणूक
अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) गावातील भैरवानाथ यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती हंगामात लाल मातीतल्या कुस्त्या रंगल्या होत्या. चितपट कुस्त्यांचा थराराने ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. डाव-प्रतिडावाने मल्लांनी आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवली.

या रंगतदार कुस्त्यांमध्ये पै. संदिप डोंगरे व पै. शिवराज कार्ले यांनी कुस्ती चितपट करुन विजय संपादन केले. निमगाव वाघा येथील पै. संदिप डोंगरे विरुध्द इमामपूरचे पै. रावसाहेब साळवे यांच्यात कुस्ती रंगली होती. डोंगरे याने उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करुन साळवे याला मोळी डावावर चितपट केले. तर चास येथील पै. शिवराज कार्ले विरुध्द नगर शहरातील पै. प्रतिक कराळे यांच्यात झालेल्या कुस्तीत कार्ले याने ढाक मारुन कराळे याला आसमान दाखविले. या चितपट कुस्ती करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विजयी मल्लास दाद दिली. ग्रामस्थांनी विजयी मल्ल डोंगरे व कार्ले याला रोख बक्षिस देऊन सत्कार केला.

माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मल्लांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. ग्रामस्थांसह उपस्थित पाहुण्यांनी विजयी मल्लांवर रोख बक्षीसांचा वर्षाव केला. गावात श्री नृसिंह विद्यालयाच्या मैदानावर लोकवर्गणीतून नव्याने बांधण्यात आलेल्या लाल मातीच्या आखाड्यात कुस्ती हंगामा रंगला होता. यावेळी नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघाला मान्यता मिळाल्याबद्दल नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच राजेंद्र गावखरे, उपसरपंच युवराज कार्ले, विजय कार्ले, राधाकृष्ण वाळुंज, दिपक कार्ले, भिमा देवकर, सागर कार्ले, अर्जुन कार्ले, देवराम कार्ले, उत्तम कार्ले, दत्तू कार्ले, प्रा. रंगनाथ सुंबे, आशिष आचारी, रावसाहेब कार्ले, बापू गावखरे, शिवाजी कार्ले, रावसाहेब भोर, मेजर जगन्नाथ गायकवाड, रमेश रासकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.