क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश
शासन निर्णयातील मागील सलग दोन वर्षे जीवित नोंदणीची अट केली रद्द
अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू कामगारांना कल्याण मंडळाकडून मिळणारे सन्मानधन योजनेतील जाचक अटी रद्द होऊन घरेलु कामगारांना सन्मान धन योजनेचे लाभ मिळण्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून देण्यास सुरुवात झाली आहे. क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने लाभार्थी महिलांच्या अर्जाचे प्रत कामगार अधिकारी तुशार बोरसे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, कल्पना सावंत, मिराबाई जाधव, शोभा बिरारे, सरस्वती त्रिंबके, हिराबाई झरे, नसिम पठाण, कमल वाघचौरे, मिरा बनकर, रत्नमाला कोकणे, सविता धाडगे आदींसह घरेलू कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सन्मान धन योजनेसाठी पहिल्या टप्प्यातील 17 महिलांना लाभ मिळाला असून, त्यांच्या खात्यात 10 हजारचे अनुदान जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, इतर लाभार्थींना देखील हा लाभ मिळणार असल्याची माहिती अनिता कोंडा यांनी दिली.
सन्मानधन योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासन निर्णयातील जाचक अट रद्द होण्यासाठी क्रांती असंघटित कामगार संघटनेने पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून, लाभार्थी महिलांना 10 हजारचे अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे. 5 जानेवारीच्या शासन निर्णयात वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदीत व मागील सलग दोन वर्षे जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. याचा अर्थ 2022 अगोदर मागील दोन वर्षे म्हणजे 2020 असा होतो, 2020 मध्ये कोरोना महामारीचे संकट होते. या महामारीत कल्याण मंडळाकडे कोणत्याही घरेलू कामगारांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे शासनाच्या या योजनेसाठी पात्र घरेलू कामगारांना वंचित रहाण्याची वेळ आली होती. याबाबत संघटनेच्या वतीने राज्य शासनाला ही जाचक अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
याबाबत राज्य सरकारने याची दखल घेऊन 25 मार्च रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमीत केला असून, त्यामध्ये 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदीत व जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना 10 हजार रुपयाचे अनुदान खात्यात वर्ग करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पाठपुराव्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांचे सहकार्य मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. या शासन निर्णयामुळे लाभार्थी घरेलू कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, सन्मानधन योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याने घरेलू कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.