भागानगरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी हुच्चे याचे माळीवाडा येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी
दोन दिवसात अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- ओमकार उर्फ गामा भागानगरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश हुच्चे याने सरकारी जागा व ओपन स्पेसवर केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी महापालिकेत गामा भागानगरे मित्र परिवाराच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कृष्णा भागानगरे, रोहित सोनेकर, कृष्णा लोळगे, यश भागानगरे, राहुल श्रीपत, ओंकार भिंगारदिवे, शुभम कोमाकुल, संकेत कंठाळे, सूरज गेनप्पा, शिवतेज भागानगरे, विशाल भागानगरे आदी सहभागी झाले होते.
एका महिन्यापूर्वी स्व. ओमकार भागानगरे यांचा भाऊ कृष्णा भागानगरे याने मनपाच्या अतिक्रमण विरोधी विभागाला गणेश हुच्चे याने बारा ते पंधरा वर्षापासून माळीवाडा भागातील शिवम टॉकीज समोर हॉटेलचे व ब्राह्मण गल्ली येथे राहत्या घरी ओपन स्पेस मध्ये बेकायदेशीर ताबा मारल्याची तक्रार दिली आहे.
शिवम टॉकीज समोर सरकारी इमारतीत हुच्चे याचा दारू, जुगार, ऑनलाईन बिंगो जुगार असे अवैध धंदे चालतात. त्याने दुकानाबाहेर पत्र्याचे शेड व टपरीचे अतिक्रमण देखील केले आहे. त्याच्या राहत्या घरासमोर म्हशीसाठी गोठा व चारा ठेवण्यासाठी पत्र्याचे मोठे शेड तर दारूच्या मोकळ्या बाटल्या ठेवण्यासाठी मोठी जागा बळकवली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गणेश हुच्चे याच्या अतिक्रमण संबंधी तक्रार करुन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट आरोपीचे वडिलांना बोलावून त्यांचे अतिक्रमण विभागाने देवाण-घेवाण करुन चहापाण केल्याचा आरोप गामा भागानगरे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे. दिशाभूल करणारी कारवाई अपेक्षित नसून, सदरचे अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त डॉ. पठारे यांनी दोन दिवसात सदरचे अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.