ड्रेनजलाईन टाकून देण्याची रिपाईची मागणी
अन्यथा नागरिकांसह महापालिकेत उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गाझीनगर काटवन खंडोबा रोड येथील साई कॉलनीत ड्रेनजलाईन नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने ड्रेनजलाईन टाकून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे गुलाम अली शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, रेशमा खान, गायत्री कराड, संगीता दारकुंडे, जयश्री दारकुंडे, समीना बागवान, योगिता टेके, रोहिणी थोरात, सुमन राजपूत, शकीला बागवान, शबाना शेख, विमल चव्हाण, जास्मिन शेख, कल्पना अकसाळ, हर्षदा वर्तले, सुनिता कानडे आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गाझीनगर काटवन खंडोबा रोड येथील साई कॉलनीत मोठी लोकवस्ती आहे. या भागात कोणत्याही प्रकारची ड्रेनेज लाईन नसल्याने नागरिकांना सांडपाणी सोडण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर भागात नागरिकांनी शोषखड्डे घेतले असून, शोष खड्डा भरल्यास सर्व मैला वरती येऊन परिसरात दुर्गंधी पसरत आहे. दैनंदिन सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी या भागात कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.
सांडपाणी जाण्यास जागा नसल्याने या भागात असलेल्या मोकळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून आहे. त्यामुळे देखील परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता पसरुन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

महापालिका प्रशासनाने तातडीने शहरालगत असलेल्या गाझीनगर काटवन खंडोबा रोड येथील साई कॉलनीत अंतर्गत ड्रेनजलाईन टाकण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा स्थानिक नागरिकांसह महापालिकेत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
ड्रेनजलाईन नसल्याने गाझीनगरच्या साई कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांच्या ड्रेनजलाईनचा प्रश्न आहे. लोकवस्ती वाढत असताना दैनंदिन सांडपाणी, मैलामिश्रित घाण पाण्याची विल्हेवाटाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. मोकळ्या जागेत सांडपाणी साचून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या भागात साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त असून, याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. नागरिक फक्त कर भरण्यापुरते नसून, त्यांना महापालिकेने नागरी सुविधा द्याव्या. -गुलाम अली शेख (शहर जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्यांक विभाग)
