रिपाईच्या जामखेड तालुका अध्यक्षपदी आदिल शेख यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- खोके आणि बोक्यांच्या राजकारणाने जनता वैतागली असून, सर्वसामान्यांना विकास व त्यांचे प्रश्न सुटणे अपेक्षित आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न ज्वलंत असताना, याकडे दुर्लक्ष करुन जिरवाजिरवीच्या राजकारणाने सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. सर्वसामान्यांच्या संयमाचा बांध तुटू लागला असल्याचे प्रतिपादन रिपाईचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) अल्पसंख्याक आघाडीच्या जामखेड तालुका अध्यक्षपदी आदिल शेख यांची निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकित शहराध्यक्ष म्हस्के बोलत होते. यावेळी दानिश शेख, निजाम शेख, गुलाम शेख, संतोष पाडळे, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, सचिन शिंदे, नईम शेख, जमीर इनामदार, आजीम खान, बंटी बागवान, जावेद सय्यद,अरबाज शेख, इम्रान शेख, दिनेश पाडळे, सुफियांन काजी, हुसेन चौधरी, सोहेल शेख, अनिकेत भंडारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे म्हस्के म्हणाले की, जनतेपेक्षा राजकीय हित पाहणार्यांना जनतेने लक्षात घ्यावे. रिपाईच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कार्य केले जात आहे. युवकांना संघटित करुन दुबळ्या घटकांचे प्रश्न सोडविण्यात येत आहे. सर्व सामान्यांना आधार देऊन अन्यायाला वाचा फोडण्याचे काम रिपाईच्या वतीने सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना जामखेड तालुका अध्यक्ष आदिल शेख यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नाकडे सत्ताधारी व इतर पक्ष दुर्लक्ष करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने रिपाई पक्षाची वाटचाल सुरु असून, या पक्षाद्वारे अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळणार असल्याचे त्यांनी सांगून, जामखेड तालुक्यात पक्षाचे मोठे संघटन उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला.